अजित पवार यांच्या प्रचार रॅलीचे जवळपास ४ विधानसभा मतदारसंघात आयोजन करण्यात आले होते. पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणुका लढवत आहेत. त्यामुळे पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये आपले तिकीट डावललं गेले असल्याची भावना पाहायला मिळत होती. त्यामुळे अनेक जण नाराजी बोलून दाखवत होते.
आम्ही निष्ठावंत-आमचे तिकीट नाकारले, आमच्यावर अन्याय झालाय
advertisement
याच नाराजीचा प्रत्यय आज स्वतः अजित पवार यांना आलेला पाहायला मिळाला. अजित पवारांच्या प्रचार रॅली वेळी शरद पवार यांच्या पक्षातील काही कार्यकर्ते रॅली थांबवून अजित पवारांकडे गेले. आम्ही निष्ठावंत असून आमचे तिकीट नाकारले, आमच्यावर अन्याय झालाय, दादा तुम्ही तोडगा काढा, अशी विनवणी त्यांनी केली. या सगळ्या कार्यकर्त्यांच्या हातात तुतारीचे पोस्टर्स होते, तेच पोस्टर्स घेऊन ते अजित पवार याच्या रॅली समोर आले.
प्रभाग क्रमांक २७ मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हे सगळे कार्यकर्ते होते. या प्रभागात सगळे उमदेवार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे असून आम्ही काम केले, एकनिष्ठ राहिलो तरी आम्हाला डावलले गेले असा थेट आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळविण्यासाठी अजितदादा कंबर कसून कामाला लागले
पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन्ही शहरं खरं तर पवारांचा बालेकिल्ला. परंतु २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दोन्ही शहरांवर कब्जा मिळवला. राष्ट्रवादीच्या ताब्यातून दोन्ही महापालिका हिसकावून भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. बालेकिल्ला हातून गेल्याची रूखरूख अजित पवार यांना लागून राहिली आहे. आता तोच बालेकिल्ला पुन्हा मिळविण्यासाठी अजित पवार कंबर कसून कामाला लागले आहेत.
