पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी निलंबित उपनिबंधक (सब रजिस्टर) रविंद्र तारू याला बावधन पोलिसांनी रविवारी रात्री बेड्या ठोकल्या. रवींद्र तारू याने गैरव्यवहार करत संबंधित प्रकरणाचे दस्त बनवून दिले असल्याचा आरोप आहे.
रविंद्र तारू याला पुणे पोलिसांकडून बेड्या
पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन घोटाळ्याप्रकरणी ६ नोव्हेंबर रोजी पुण्याच्या बावधन पोलीस ठाण्यात शीतल तेजवाणी, दिग्विजय पाटील,निलंबित सब रजिस्टर रवींद्र तारू यांच्या विरोधात मुद्रांक शुक्ल बुडवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी रविंद्र तारू याला अटक करून सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येईल.
advertisement
जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांवर कारवाई का नाही? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...
पुणे येथील कथित जमीन घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. चौकशी अहवाल उच्च न्यायालयात सादर होतो. त्यामुळे यावर अधिक बोलणे उचित नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पार्थ पवार यांच्यावर न झालेल्या कारवाईवर फडणवीस यांना हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींना प्रश्न विचारला.
पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुणे जमीन घोटाळ्याचे प्रकरण काय आहे
पुणे जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. या प्रकरणात पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आले आहे. हे प्रकरण कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाच्या जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीशी संबंधित असून, यावर चौकशी समिती नेमण्यात आली आहे. अठराशे कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटीत घेतल्याचा अमेडिया कंपनीवर आरोप आहे. तसेच धक्कादायक बाब म्हणजे खरेदीचा मुद्रांक शुल्कही बुडविल्याचे समोर आले आहे.
