रस्ते बंद करणे , रात्री बेरात्री पोलिस ठाण्यासमोर हजारोंच्या संख्येने गोळा होऊन घोषणा देणे , आत्ताच निर्णय झाला पाहिजे नाहीतर उठणार नाही असं म्हणत आक्रमक होणे ही सध्याची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची पद्धत झाली. पोलिसांकडून मात्र भविष्यातले अधिकारी म्हणून कायदेशीर कारवाई करण्याऐवजी समजावून सांगण्यावर किंवा अगदी त्यांचे मुद्दे सरकारी पातळीवर पोहोचवण्यापर्यंत प्रयत्न करून पोलिसांनी ही आंदोलन संपवली. पण आता या आंदोलनांना वेगळाच वास येत आहे. ज्यात आपली पोळी भाजून घेण्यासाठी क्लासेसचालक पडद्यामागून सक्रिय होत आहेत. अगदी राजकीय पुढाऱ्यांना ही या आंदोलनात आणण्यासाठी उठाठेव ही त्यांनी केल्याच समोर आलं आहे.
advertisement
कधी नवीपेठेत गोपीचंद पडळकर तर कधी रोहित पवार , कधी अतुल लोंढे तर कधी शरद पवार या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होतात. या आंदोलनाची वेळ ही रात्री-अपरात्री कोणत्याही क्षणी आंदोलने सुरू होतात. त्याशिवाय, आंदोलनाची ठिकाणे ही अलका टॉकीज चौक किंवा बालगंधर्व सारखी गर्दीच्या रहदारीची ठिकाणं असतात. कधी मागण्या योग्य, न्याय्य असल्याच्या दिसतात. तर कधी जाणीवपूर्वक शासनाला आयोगाला पेचात पकडनाऱ्या असतात. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनांनी पुणे पोलिसांना हैराण केले होते. त्यामुळेच हे नक्की होतं कसं ? काही मिनीटात शेकडो काही वेळा हजारो विद्यार्थी गोळा कसे होतात याचा तपास पोलिसांनी केला आणि धक्कादायक माहिती समोर आली.
क्लास चालकांकडून विद्यार्थ्यांचा वापर...
एमपीएससीच्या या विद्यार्थ्यांना काही क्लासचालक स्वतःच्या फायद्यासाठी आंदोलनं करायला प्रेरित करत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी याच विद्यार्थ्यांमधल्या पुढाऱ्यांना वापरून विद्यार्थ्यांना भडकवल जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या क्लासचालकांची बैठक घेऊन पोलीस आयुक्तांनी त्यांना सज्जड दम भरलाय. पुन्हा असा प्रकार निदर्शनास आला तर गुन्हे दाखल करून क्लासेस बंद करू असंही सुनावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आता या क्लासेसला महापालिकेच्या परवानग्या, अग्निशमन दलाकडून दिल्या जाणाऱ्या फायर एनओसी आहेत का त्याची ही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना भडकावून आंदोलनात उतरवणारे क्लासेसकडून काही बेकायदेशीर कामे झाली असतील तर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.
विद्रोह असल्याचा फील...
पुण्यात गेल्या दहा वर्षात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या मुलांची संख्या पाच ते सहा लाखांपर्यंत वाढलीय .. मध्य पुण्यात असलेल्या अभ्यासिका , क्लासेस यामुळे या भागात हे विद्यार्थी राहत असल्याने दिवसरात्र इथेच असतात. कधीही आंदोलनाचा येऊन रस्त्यावर आंदोलन करायला या मुलांना विद्रोही असल्याचा फील येतो ..अभ्यासाशिवाय पूर्ण माहिती नसताना ही त्यांना फितवल जातंय त्यांचा वापर केला जातोय याची कल्पना त्यांना नसल्याचे समोर आले आहे.