महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि पुण्याचे माजी पालकमंत्री राहिलेल्या चंद्रकांत पाटलांनी डीसीपीला फोन करून गौतमीला उचलणार आहात की नाहीत, असा जाब विचारला. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात एका कारने रिक्षाचालकाना धडक दिली होती. ही कार गौतमी पाटीलची असल्यानं याप्रकरणी गौतमी पाटीलला अटक करा अशी मागणी जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी केली. हा अपघात घडल्यानंतर गौतमी पाटीलच्या कारचा चालक घटनास्थळाहून फरार झाला होता. नंतर मात्र पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले होतं. पण, आता गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघातानंतर जखमी झालेल्या रिक्षा चालक कुटुंबियांची मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट घेतली. यावेळी त्यांना गौतमी पाटीलला अटक करण्याची मागणी केलीय.
advertisement
विशेष म्हणजे, चंद्रकांत पाटलांनीही गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणाची दखल घेत पुणे पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत. गौतमी पाटीलला उचलायचं की नाही, असा सवाल विचारत चंद्रकांत पाटलांनी डीसीपी संभाजी पाटलांना सुनावलं.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी मंत्री चंद्रकांत पाटलांवर ट्वीटद्वारे टीका केलीय. चंद्रकांत पाटील पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय.
माननीय चंद्रकांतदादा पाटील, तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही. गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळं रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे, दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे. पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही…, असे रोहित पवार म्हणाले.
दुसरीकडे अपघात करणारं वाहन हे नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या नावानं असल्यानं पुणे पोलिसांनी तपासासाठी गौतमी पाटीलला नोटीस पाठवली आहे. चौकशीला हजर राहण्याचे पोलिसांनी गौतमीला दिले आहेत. गौतमीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता.
पुण्यात कारनं रिक्षाचालकाला धडक दिल्यानं आणि आता रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं, गौतमीची अडचण झालीय. चंद्रकांत पाटलांचे आदेश आणि पोलिसांनी नोटीस बजावल्यानं, आता गौतमीला अटक होणार का? अशी चर्चा सुरू झालीय. ही चर्चा केवळ चर्चाच ठरते की खरी होते? हे येणारा काळच ठरवणार आहे. पण, सध्या तरी गौतमीच्या कारनं नवा वाद निर्माण केलाय, एवढं निश्चित.