प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी आरटीओची मोहीम
नोकरी, शिक्षण, व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात राहणाऱ्या इतर जिल्ह्यांतील नागरिकांची संख्या जास्त आहे. दसरा आणि दिवाळीच्या काळात हजारो नागरिक सणानिमित्त आपल्या गावी जातात. त्यामुळे सणांच्या काळात रेल्वे गाड्या व एसटीचं बुकिंग फुल असतं. अशा वेळी गावी जाणाऱ्यांना खासगी बसशिवाय पर्याय राहत नाही. याच संधीचा फायदा घेऊन अनेक खासगी बसचालक दुप्पट तिकीटदर आकारतात. एसटी भाड्याच्या दीडपट दरापेक्षा अधिक भाडं आकारणं बेकायदेशीर आहे.
advertisement
Pune Traffic: अनंत चतुर्दशीला वाहतुकीत मोठे बदल, PMP च्या 5 स्थानकांचे स्थलांतर, कुठून सुटतील बस?
येथे करा तक्रार
जास्तीचे भाडे आकारले जात असल्यास प्रवाशांनी तत्काळ प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. यासाठी 8275330101 हेल्पलाइन क्रमांक आणि buscomplaint.rtopune@gmail.comहा ई-मेल आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तक्रार नोंदवताना प्रवाशांनी आपलं नाव, मोबाइल क्रमांक, प्रवास मार्ग, बस क्रमांक, बसचा प्रकार, बसमधील फोटो आणि तिकिटाची प्रत जोडणं आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.
पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले म्हणाले, "सणासुदीच्या काळात खासगी बसचालकांकडून प्रवाशांची लूट होऊ नये, यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. प्रवाशांकडून जादा तिकीट घेतल्यास तक्रार करण्याचं आवाहन आरटीओनं केलं आहे. यासाठी हेल्पलाइन क्रमांक आणि ई-मेल आयडी असलेले फलक शहरातील खासगी बसतळांवर लावण्यात आले आहेत. प्रवाशांकडून आलेल्या तक्रारींची पडताळणी करून नियमभंग करणाऱ्या बसचालकांवर कारवाई केली जाईल."