भरधाव वेगाने येणाऱ्या एका गाडीने भावे हायस्कूल जवळ १२ जणांना उडवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कॅब चालकाने मद्यप्राशन केले होते. चालक हा पुण्याचा असून त्याचे नाव जयराम शिवाजी मुळे असे आहे. तो समर्थ नगर कॉलनी बिबेवाडी येथील रहिवासी आहे.
नेमके काय घडले?
शनिवारी सायंकाळी सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ असलेल्या नाथसाई या चहाच्या दुकानात सर्व विद्यार्थी चहा घेण्यासाठी थांबले होते. तेव्हा भरधाव वेगाने आलेल्या टुरिस्ट गाडी हुंडाईने या १२ जणांना उडवले. दरम्यान विश्रामबाग पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. सर्व जखमींना संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती.
advertisement
पुण्याच्या विविध रुग्णालयांत विद्यार्थ्यांवर उपचार सुरू
या घटनेत काही विद्यार्थी गंभीर तर काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर विद्यार्थ्यांना पुण्यातील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
