रायगड: रोहा तालुक्यातील भालगाव येथील आदिवासी कुटुंबावर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आगरदांडा येथे गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या वाघमारे कुटुंबावर मिठागर येथील नऊ जणांनी एकत्रित हल्ला केला. या प्रकरणी मुरुड पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत सर्व नऊ आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
advertisement
घटना 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. सुमीत मंगेश वाघमारे हा आपल्या मिठागर येथील एक मुलीसोबत तिच्या घरी गणेश दर्शनासाठी गेला होता. त्याचाच राग काढण्यासाठी आरोपींनी भालगाव येथील आदिवासी वाडीत येऊन मंगेश वाघमारे यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, काका आणि चुलत भावाला मारहाण केली. लाथाबुक्क्यांसह धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याने चुलत भाऊ रामचंदर वाघमारे यांना डोक्यावर आणि त्यांचा मुलगा सागर याला पायावर गंभीर दुखापत झाली.
जखमींना तत्काळ मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याचबरोबर रायगडचे उपविभागीय पोलिस अधिकारी माया मोरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
मंगेश महादेव वाघमारे यांच्या तक्रारीनुसार दिपेश कृष्णा ठाकूर, विजय विठ्ठल पाटील, परेश कृष्णा ठाकूर, विराज विजय ठाकूर, करण विठोबा चिपकर, सुजय संतोष शहापुरकर, दिपेश दत्ताराम माळी, विनिते विजय ठाकूर आणि सागर पांडुरंग ठाकूर या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
गणेशोत्सवाच्या काळातच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून अधिक तपास सुरू आहे.