रायगड : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट-गणांचे आरक्षण आणि प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर
रायगडमध्ये इच्छुकांनी मोर्चेबांधणीला जोमाने सुरुवात केली आहे. निवडणूक स्वबळावर, महायुतीद्वारे की महाविकास आघाडीद्वारे लढायची, याबाबत नेमकी स्पष्टता दोन्ही बाजूंकडून येत नसल्याने संभ्रमावस्था दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कर्जत, खोपोली आणि माथेरान नगरपालिकेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा गट एकत्र लढण्याची चिन्हे आहेत.
advertisement
आज कर्जत विकास आघाडी तयार झाली असून या संबंधीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या कार्यालयात झाली. यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा गटाचे कर्जत विकास आघाडीवर शिक्कामोर्तब झालं आहे.ही विकास आघाडी कर्जत खालापूर तालुक्यातील नगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक एकत्रित लढवणार आहेत.
बैठकीला कोण कोण उपस्थित होते?
या बैठकीला राष्ट्रवादी कडून रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे,प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक भोपतराव,भगवान भोईर,रंजना धुळे तर उबाठा शिवसेना यांच्या वतीने उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत,तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, कर्जत विधानसभा प्रभारी बाजीराव दळवी अनेक विभाग प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदांचे आरक्षण जाहीर
राज्य शासनाने जाहीर केलेल्या नगराध्यक्षाच्या सोडतीत रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदेंचा समावेश आहे. या सोडतीमध्ये माथेरान, म्हसळा, अलिबाग, उरण, खालापूर, खोपोली नगरपरिषदा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. तर पेण नगरपरिषद महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे. कर्जत, रोहा, श्रीवर्धन नगरपरिषदेंवर ओबीसी महिला आरक्षण पडले आहे. महाड नगरपरिषद ही ओबीसीसाठी आरक्षित झाली आहे.
