काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांचा निकटवर्तीय आपल्याकडे खेचला होता. त्यानंतर आता भाजपच्या स्थानिक नेत्यालाही आपल्याकडे खेचले आहे. श्रीवर्धन मतदारसंघातील भाजपचे नेते रवी मुंढे यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटाच्या शिवसेनेत घरवापसी केली आहे. तळा येथे आयोजित विशेष कार्यक्रमात राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रवी मुंढे आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.
advertisement
रवी मुंढे यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर अवधूत तटकरे यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. अत्यंत चुरशीच्या लढतीत त्यांचा केवळ ७७ मतांनी पराभव झाला होता. अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे असल्याने त्या वेळी या लढतीने रायगड जिल्ह्यात मोठं राजकीय लक्ष वेधलं होतं.
त्यानंतर रवी मुंढे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र तिथे त्यांना संघटन बळकट करण्यात अडथळे येत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ पक्षात म्हणजेच शिंदे गटाच्या शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला.
या प्रवेश सोहळ्याला स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. मंत्री भरत गोगावले यांनी रवी मुंढे यांचे स्वागत करताना म्हटलं, “श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी रवी मुंढे यांची घरवापसी निर्णायक ठरणार आहे.”
या हालचालीमुळे श्रीवर्धन मतदारसंघातील आगामी राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
