नेमकी घटना काय?
तक्रारदार महिला ही ४१ वर्षांची असून तिने नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिला या क्षेत्रात कामाचा दांडगा अनुभव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगेश नेने याने "आपल्या शिक्षण संस्थेत नर्सिंगचा कोर्स सुरू करायचा आहे, त्यामध्ये तुला चांगल्या पगाराची नोकरी देतो आणि इतरही मदत करतो," असे आमिष दाखवून पीडित महिलेशी जवळीक साधली होती.
advertisement
लग्नाचे आमिष आणि शारीरिक शोषण
ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर आरोपीने पीडितेवर जाळे फेकण्यास सुरुवात केली. "माझे पत्नीशी पटत नाही, मी तिला लवकरच घटस्फोट देणार आहे. त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करून तुला घरी घेऊन येईन," असे भावनिक आश्वासन त्याने दिले. या लग्नाच्या आमिषाला बळी पडून पीडितेने त्याच्याशी संबंध ठेवले. आरोपीने गेल्या दोन वर्षांपासून पीडितेचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
अचानक संपर्क तोडला अन्...
गेली दोन वर्षे हे शोषण सुरू होते. मात्र, काही काळापूर्वी आरोपीने अचानक पीडित महिलेशी संपर्क तोडला आणि लग्नाच्या आश्वासनापासून पळ काढू लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने नवी मुंबईतील कामोठे पोलीस ठाणे गाठले आणि लेखी तक्रार नोंदवली.
पोलिसांची कारवाई
महिलेच्या तक्रारीची गंभीर दखल घेत कामोठे पोलिसांनी ॲड. मंगेश नेने यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, आरोपीवर काय कायदेशीर कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे कृत्य केल्याने शिक्षण वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
