२० लाखांची सुपारी आणि 'पुणे' कनेक्शन
मंगेश काळोखे यांच्या हत्येचा कट अत्यंत नियोजनबद्ध होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र देवकर हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असून, त्याने इशा पापा शेख हिच्या मध्यस्थीने कॉन्ट्रॅक्ट किलर्सना २० लाख रुपयांची सुपारी दिली होती. या मोहिमेत आदिल मुखत्यार शेख, खालीद खलिल कुरेशी आणि इतर साथीदारांचा समावेश होता. पुण्याच्या वानवडी पोलिसांनी खालीद खलिल कुरेशी (वय २३) याला हडपसर भागातून शिताफीने ताब्यात घेतले, ज्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
advertisement
२६ डिसेंबरचा तो थरार
२६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७ च्या सुमारास मंगेश काळोखे आपल्या मुलाला शाळेत सोडून घरी परतत होते. खोपोलीतील जया बार परिसरात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी काळ्या रंगाच्या कारमधून त्यांचा पाठलाग केला. तोंडाला रुमाल बांधलेल्या ५ ते ६ जणांनी काळोखे यांच्यावर तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला होता.
निवडणुकीचा निकाल आणि जुने वैमनस्य
या हत्येमागे राजकीय वैमनस्य कारणीभूत असल्याचं समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या खोपोली नगरपालिका निवडणुकीत मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे (शिवसेना शिंदे गट) यांनी रवींद्र देवकर यांच्या पत्नी उर्मिला देवकर (राष्ट्रवादी अजित पवार गट) यांचा पराभव केला होता. या पराभवाचा राग आणि कुटुंबातील जुन्या वादातून हा खुनाचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत या हत्याकांडाचा मुख्य आरोपी रवींद्र देवकर, त्याचा मुलगा धनेश देवकर, पत्नी उर्मिला देवकर (माजी नगरसेविका), इशा पापा शेख (मध्यस्थ), खालीद खलिल कुरेशी, आदिल मुखत्यार शेख (शूटर) दर्शन देवकर, सचिन चव्हाण आणि अन्य अशा एकूण १२ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि भरत भगत यांचीही नावे चर्चेत होती, मात्र सध्या तरी त्यांचा थेट सहभाग आढळलेला नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अद्याप एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
