मनसेचे कोकण संघटक आणि राज्य संघटक वैभव खेडेकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. वैभव खेडेकर हे मागील काही महिन्यांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू होती. खेडेकर यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी मनसेच्या वरिष्ठ नेत्याशी चर्चा देखील केली. मात्र, त्यानंतरही खेडेकर यांची नाराजी कायम राहिली. वैभव खेडेकर हे भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. येत्या काही दिवसातच त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्याआधीच खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
advertisement
कोण आहेत वैभव खेडेकर?
वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांचे कोकणातील महत्त्वाचे मानले जातात. मनसेच्या स्थापनेपासून ते पक्षात कार्यरत आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वैभव खेडेकर यांनी दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. राज खेड नगरपरिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते यापूर्वी खेडचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या माध्यमातून कोकणात मनसेचा झेंडा फडकला होता.
खेडेकर यांच्यासोबत कोणाची हकालपट्टी?
वैभव खेडेकर यांच्यासह एकूण 4 जणांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये राजापूरमधील अविनाश सौंदळकर, चिपळूणमधील संतोष नलावडे आणि माणगाव रायगडीमधील सुबोध जाधव यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पक्षविरोधी नियम आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे मनसेने आपल्या पत्रकात म्हटले आहे.