उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरवला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी अर्ज भरला होता. मात्र छाननीत त्यांचाच अर्ज बाद झाल्याने अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. थिटे यांचा अर्ज बाद झाल्याने राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या मार्गातील सगळ्यात मोठा अडथळा दूर झाल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर राजन मालकांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.
advertisement
राजन मालकांच्या लेकाचं थेट अजितदादांना चॅलेंज
अजित पवार, कुणाचाही नाद करा पण अनगरकरांचा नाद करायचा नाही, असे म्हणत बाळराजे पाटील यांनी अजित पवार यांना आव्हान दिले. बाळराजे पाटील हे अजित पवार यांना आव्हान देत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल झाला आहे.
प्राजक्ता पाटील यांच्या उमेदवारीला अजित पवार यांनी उज्ज्वला थिटे यांच्या माध्यमातून आव्हान दिले होते. मात्र थिटे यांचा अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादीचे आव्हान संपुष्टात आले. पाटील आणि पवार यांच्यात फारसे कलह नव्हते. मात्र काही दिवसांपूर्वी राजन पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दणका दिला. राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या पदाचा राजीनामा देऊन आपण कमळ हाती घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. दत्ता भरणे यांच्या माध्यमातून राजन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना थोपविण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. मात्र भरणे आणि अजित पवार यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्जला थिटे यांचा उमेदवारी अर्ज कशामुळे बाद झाला?
जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे याच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला. उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवला.
