सिंधुदुर्ग: दसऱ्याच्या दिवशी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. राजकीय सीमोल्लंघन करणाऱ्या राजन तेली यांनी आता आता जिल्ह्याच्या राजकारणात आक्रमक भूमिका घेतली आहे. राजन तेली यांनी थेट राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच जिल्ह्यात राजन तेली विरुद्ध राणे असा वाद रंगण्याची चिन्हे असून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.
advertisement
जिल्हा बँकेतील कथित कर्ज घोटाळ्यावरून तळकोकणात राजकीय वादाला चांगलाच तापणार असल्याचे म्हटले जात आहे. माजी आमदार राजन तेली यांनी अलीकडेच शिवसेना (ठाकरे गट) सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र पक्षांतरानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
राजन तेली यांनी म्हटले की, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अवैध कर्जवाटप प्रकरणाचे मुख्य सूत्रधार नितेश राणेच आहेत. मंत्री राणे यांनी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर दबाव टाकून मनमानी पद्धतीने कोट्यवधींची कर्जे मंजूर केली. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालकांकडे केली आहे.
यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या फसवणुकीसंबंधी दिल्लीतील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडे राजन तेली यांच्यासह आठ जणांची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर ठाकरे गटाची मशाल बाजूला ठेवून त्यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. आता त्यांच्याच आरोपांमुळे महायुतीत अंतर्गत कलह उफाळून आल्याचे चित्र दिसत आहे.
तेली यांनी पुढे सांगितले की, बँकेत कामगारांना आठ कोटी रुपयांपर्यंत कर्जे, तर बँकेच्या कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तींनाही मोठ्या रकमांची कर्जे वाटप करण्यात आली आहेत. या व्यवहारामागे भू-माफियांचा हात असल्याचा आरोप करत त्यांनी त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच नाबार्ड, सहकार निबंधक आणि स्थानिक पोलिसांकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा आरोप तेली यांनी केला आहे. त्यांनी पुढे म्हटले की, “900 कोटी रुपयांची कर्जे विविध साखर कारखान्यांना देण्यात आली, त्यापैकी अनेक कारखाने बंद आहेत. या कारखान्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या आरोप-प्रत्यारोपांमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरु झाली असून, राणे व तेली यांच्यातील थेट संघर्षाने महायुतीत अस्वस्थता वाढवली आहे.