राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता नसल्याचे चित्र आहे. शरद पवार यांना पुन्हा उमेदवारी द्यावी असा मतप्रवाह सुरू असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेसाठी आपल्या पक्षाचा दावा केला आहे. संख्याबळ आमचं अधिक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. तर, महाविकास आघाडीत येत्या काही दिवसांत निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे
advertisement
'राष्ट्रवादी' विलीनीकरणाच्या चर्चेने काँग्रेस सावध
शरद पवार यांना पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस हायकमांड सध्या 'थांबा आणि वाट पाहा' (Wait and Watch) या भूमिकेत असल्याचे समजते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट पुन्हा एकत्र येण्याच्या किंवा विलीनीकरणाच्या वावड्या सतत उठत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले खासदार भविष्यात एनडीएच्या गोटात सामील झाल्यास पक्षाची मोठी नाचक्की होईल, अशी भीती काँग्रेस नेत्यांना सतावत आहे. यामुळेच पवारांच्या उमेदवारीला हिरवा कंदील देण्यापूर्वी काँग्रेस अत्यंत सावध पावले टाकत आहे.
ठाकरे गटाचं धक्कातंत्र?
दुसरीकडे, ठाकरे गटाने या जागेवर आपला हक्क आधीच सांगितला आहे. आदित्य ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांपासून या मुद्द्यावर घेतलेली आक्रमक भूमिका बरंच काही सांगून जात आहे. दैनिक पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, उद्धव ठाकरे यांचे नावही समोर आले आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः राज्यसभेवर जाऊन राष्ट्रीय राजकारणात सक्रिय भूमिका बजावावी, असा आग्रह त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी धरला आहे. त्यामुळे आता एकमेव जागेसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली असून काँग्रेसचा एक गट उद्धव यांच्याबाबत सकारात्मक असल्याचेही म्हटले जात आहे.
काँग्रेसचा कल ठाकरेंकडे?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसमधील एका गटाला शरद पवारांपेक्षा उद्धव ठाकरेंची उमेदवारी अधिक सोयीची वाटत आहे. ठाकरे राज्यसभेवर गेल्यास महाविकास आघाडीची ताकद दिल्लीत वाढेल आणि भविष्यातील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होतील, असा तर्क लावला जात आहे.
मविआमध्ये 'बार्गेनिंग' सुरू
शिवसेनेने (ठाकरे गट) ही जागा आमचीच असल्याचा दावा ठामपणे मांडला आहे. मात्र, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन दिग्गजांपैकी नक्की कोणाची वर्णी लागते, की एखादा तिसराच चेहरा समोर येतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
