संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज संसदेच्या चर्चेत सुनेत्रा पवार यांनी नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या तयारी संदर्भात महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत चर्चा केली. सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्सव नसून, कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धा, परंपरा आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. प्रयागराज कुंभमेळयाचा अनुभव घेत नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेळेत आणि नियोजनबद्ध तयारी होणे अत्यंत आवश्यक आहे' अशी भूमिका सुनेत्रा पवार यांनी मांडली.
advertisement
तसंच, 'साधुग्राम निर्मितीसोबत १५,००० झाडे लावण्याचा महाराष्ट्र सरकारचा संकल्प प्रशंसनीय आहे. या झाडांचे संरक्षण सुनिश्चित करून नाशिक कुंभमेळा पर्यावरण संरक्षणाचा आदर्श ठरावा' असंही यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या.
'सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा व विशेष निधीची आवश्यकता, गोदावरी आआणि उपनद्यांचे संवर्धन, तसेच भाविकांसाठी सुरक्षित आणि पुरेसा पाणीपुरवठा, वाहतूक, स्वच्छता व अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करणे , प्रयागराजच्या अनुभवातून नाशिकमध्ये वाहतूक व्यवस्था सुलभ करणे, प्लास्टिकमुक्त कुंभमेळा आयोजित करणे आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा श्रद्धा, सुरक्षितता आणि सुव्यवस्थेचा आदर्श ठरावा, यासाठी केंद्र व राज्य सरकारने समन्वयाने ठोस पावले उचलावी, अशी भूमिकाही सुनेत्रा पवार यांनी मांडली.
अजित पवार सयाजी शिंदेंच्या पाठीशी
विशेष म्हणजे, सयाजी शिंदे यांनी तपोवनमध्ये झाडं तोडण्यास कडाडून विरोध केला आहे. सयाजी शिंदे यांनी काही वर्षांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. सयाजी शिंदे यांनी कडाडून विरोध केल्यामुळे भाजप नेत्यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तर अजित पवार यांनी ट्वीट करून सयाजी शिंदे यांची पाठराखण केली होती. "तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहीलं, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे' असं अजितदादांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
