रामदास कदम आणि अनिल परब यांच्यात आता आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरु झाला आहे. दोन्ही नेत्यांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. या वादाची सुरुवात शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना मेळाव्यात झाली. उद्धव ठाकरेंवर शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवाची अवहेलना केल्याचा गंभीर आरोप कदमांनी केला होता. रामदास कदमांच्या या आरोपामुळं वादाचा भडका उडालाय. रामदास कदमांचे हे आरोप फेटाळून लावत अनिल परबांनी कदमांवर टीका केलीय.
advertisement
जगात कोणताही मृतदेह दोन दिवस शवघराशिवाय किंवा शवपेटीशिवाय ठेवता येतो का? कुठली इंजेक्शन दिली, काही जरी केले तरी ठेवता येत नाही. बाळासाहेबंचा मृतदेह दोन दिवस ठेवला गेला हा धादांत खोटा आरोप आहे, असे प्रत्युत्तर अनिल परब यांनी दिले.
तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेण्यात आल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला होता. त्यालाही अनिल परबांनी उत्तर देत बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी स्वतःचे मोल्ड बनवले होते, असा खुलासा अनिल परबांनी केलाय.
2012 साली दिवाळीच्या सुमारास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं होतं. त्यानंतर तब्बल 14 वर्षानंतर यावरून आरोप -प्रत्यारोप सुरू झालेत. अनिल परबांनी रामदास कदमांना कोर्टात खेचणार असल्याचा इशारा दिलाय. अनिल परबांचं हे आव्हान रामदास कदमांनी स्वीकारलंय. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांची नार्कोटेस्ट करण्याचं आव्हान दिलं गेलंय. दसरा मेळाव्यात रामदास कदमांनी केलेले आरोप, त्याला अनिल परबांनी दिलेलं उत्तर आणि त्यावर रामदास कदमांचं प्रत्युत्तर पाहता हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत.