मनिष खरात/राजेश जाधव प्रतिनिधी, हिंगोली/रत्नागिरी: सध्या राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. मात्र, गणेश चतुर्थीच्या दिनी काळजाचा ठोका वाढवणारी बातमी समोर आली. कोकणातून आपल्या घरी हिंगोलीत जाणारे शिक्षक दाम्पत्य अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. ही बातमी समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. हे शिक्षक दाम्पत्य घाटामार्गातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्यानंतर तर्क वितर्क लढवले जात होते. आता, या शिक्षकांचा तपास लागला असून या प्रकरणी महत्त्वाची अपडेट आली आहे.
advertisement
ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण, पत्नी स्मिता ज्ञानेश्वर चव्हाण, मुले पियुष ज्ञानेश्वर चव्हाण शौर्य ज्ञानेश्वर चव्हाण हे दिनांक 26/08/2025 रोजी दुपारी तीन वाजता हिंगोली येथे राहते गावी जाण्यासाठी निघाले. प्रवासाला सुरुवात करून देखील ते आतापर्यंत हिंगोलीत पोहोचलेले नाहीत. कुटुंबीय आणि नातलगांनी अनेक वेळा फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही मोबाईल क्रमांक "नॉट रिचेबल" लागत असल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी अखेर पोलिसांत धाव घेतली. हिंगोलीतील नातेवाईकांनी बेपत्ता दाम्पत्याला शोधण्यासाठी स्वतः प्रयत्न सुरू केले असून मार्गावरील विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे या शिक्षक कुटुंबाचा तपास सुरू केला होता.
कार सापडली...दोन्ही शिक्षक मुलांसह कुठं?
रत्नागिरीतील गुहागरमधील पोमेंडी येथील जिल्हा परिषद शाळेवर दोघेही शिक्षक म्हणून काम करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब पंढरपूरमधील एक मठात थांबल्याची माहिती समोर आली.
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील खिल्लार गावचे मूळ रहिवासी असलेले शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण त्यांची पत्नी आणि दोन मुलं रत्नागिरीहून गणपतीसाठी गावाकडे निघाले होते. परंतु त्यांचे फोन बंद झाल्यामुळे त्यांचा कुठलाही पत्ता नव्हता ते बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीयांकडून सुरू होती.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील गोंदवलेकर महाराज मठाच्या बाहेर त्यांची कार दिसून आली. येथे शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण हे कुटुंबीयांसह दोन दिवस मुक्कामी थांबले होते. कुंभार्ली घाटातून भिजल्यामुळे त्यांचा आणि पत्नीचा फोन बंद झाला होता, असे ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले. स्वतःचा तसेच पत्नीचा मोबाईल बंद असल्याने तसेच आपण स्वतः कुठे थांबलो होतो याबाबत राहते गावी अथवा मित्रांना कळवता आली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आपल्यासाठी चिंता करणाऱ्यांचे ज्ञानेश्वर चव्हाण यांनी आभार मानले.