कात्रजमध्ये घायवळ टोळीने केलेला गोळीबार असो की केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरील जैन बोर्डिंगच्या जागेशी संबंधित कथित भ्रष्टाचाराचे आरोप... शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य करीत आपले इरादे स्पष्ट केले. महायुतीतूनच आरोप होत असल्याने भाजप नेतेही त्रस्त झाले. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील भाजप नेत्यांनी रविंद्र धंगेकर यांची तक्रार थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. त्यानंतर फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेतून धंगेकर यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यानंतर धंगेकर यांनी अन्यायाविरोधात आपला लढा सुरूच राहील, असे सांगताना शिंदे यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
advertisement
अन्यायाविरोधात लढण्यासाठी एकनाथ शिंदे यांचं नेहमी पाठबळ राहील
शिवसेना पक्ष वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही. अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील, असा मला विश्वास आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो..... भगवान महावीरांचे मंदिर आणि जैन बोर्डींगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढविणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील. तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा रवी धंगेकर मागे हटणार नाही. सोबत आहेत पुणेकर, लढत राहील धंगेकर..!