रोहित आर्या यांच्यासंदर्भात आज दि. ३०.१०.२०२५ रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने प्रसार माध्यमांद्वारे शालेय विभागासंबंधी प्रसिद्ध झालेल्या तथाकथित बातम्यांबाबत राज्य सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने खुलासा केला आहे. रोहित आर्या, अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क यांचा प्रोजेक्ट लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सी. एस. आर.) च्या माध्यमातून प्रथमतः राबविण्यास दिनांक २७ सप्टेंबर, २०२२ च्या शासन पत्रान्वये मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा दिनांक ३०.०६.२०२३ रोजीच्या शासन पत्रान्वये सदर उपक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली होती आणि या कार्यक्रमासाठी या संस्थेला रू.९,९०,०००/- इतकी रक्कम अदा करण्यात आलेली आहे.
advertisement
त्यानंतर तिसऱ्यांदा सन २०२३-२४ मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत रु.२.०० कोटी रुपये दोन कोटी फक्त) इतका निधी स्वच्छता मॉनिटर टप्पा-२ हे अभियान राबविण्यासाठी शासन मान्यता देण्यात आली होती. तथापि रोहित आर्या यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये नमूद केलेल्या खर्चाचे घटक जसे जाहिरात, व्यवस्थापन खर्च, तांत्रिक समर्थन, लेट्स चेंज फिल्म दाखविण्याबाबत ऑनलाईन लिंक आदींबाबत नमूद संख्या आणि त्याचा खर्च अत्यंत ढोबळपणे दाखविला असून त्याबाबतचा तपशील खर्चाच्या अंदाजाचे निकष तांत्रिक संचालनालयाचे मार्गदर्शक तत्वे किमान नियम आदीबाबत कुठलाही ऊहापोह केलेला नसल्यामुळे आणि या योजनेच्या तांत्रिक अडचणी तसेच योजनेची परिणामकारकता कितपत होणार आहे याची स्पष्टता नसल्याने स्वच्छता मॉनिटर टप्पा-२ उपक्रम राबविता आले नाही.
त्यांनतर रोहीत आर्या, प्रकल्प संचालक, अप्सरा मिडीया एंटरटेनमेंट नेटवर्क यांनी प्रोजेक्ट लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर २०२४-२५ हा उपक्रम पुन्हा राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यास व उपक्रम राबविण्याकरिता रु.२,४१,८१,०००/- इतक्या खर्चास मान्यता देणेबाबत विनंती केली होती.
सदर प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असताना, अप्सरा मिडीया एन्टरटेनमेन्ट नेटवर्क यांच्या https://swachhtamonitor.in या खाजगी वेबसाईटवर स्वच्छता मॉनिटर २०२४-२५ या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता अप्सरा मिडीया एन्टरटेनमेन्ट नेटवर्क या संस्थेकडून शासनाच्या मान्यतेशिवाय परस्पर नोंदणी शुल्क आकारले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते.
यास अनुसरुन, शासनाच्या दिनांक २३.०८.२०२४ रोजीच्या पत्रान्वये आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र, पुणे यांना खालीलप्रमाणे कळविण्यात आले होते.
अ) अप्सरा मीडिया एन्टरटेनमेन्ट नेटवर्क या संस्थेने स्वच्छता मॉनिटर या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता शाळांकडून जमा केलेली रक्कम शासकीय खात्यात जमा करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी.
ब) अप्सरा मीडिया एन्टरटेनमेन्ट नेटवर्क या संस्थेकडून स्वच्छता मॉनिटर या उपक्रमाकरिता ती संस्था, शाळांकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही असे हमीपत्र घेण्यात यावे.
क) उपरोक्त अ) व ब) येथे नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर, स्वच्छता मॉनिटर २०२४-२५ हा उपक्रम राबविण्याकरिता अप्सरा मीडिया एन्टरटेनमेन्ट नेटवर्क या संस्थेचा प्रस्ताव शासनास सादर करावा.
तथापि प्रस्तुत प्रकरणी रोहित आर्या यांच्याकडून अपेक्षित माहिती प्राप्त न झाल्यामुळे पुढील कार्यवाही करता आलेली नाही.
