प्रदीप यांचा प्रवास सामान्य ग्रामीण पार्श्वभूमीवरून सुरू झालेला. त्यांचे आई-वडील शेती करतात. घरात ते पहिले पदवीधर आहेत. अत्यंत मर्यादित साधनसामग्री असूनही त्यांनी हार न मानता 2017 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. याआधी अनेक वेळा निकाल जवळपास आला पण पूर्ण यश मिळालं नव्हतं. मात्र, या वेळी मी डीवायएसपीसाठी पूर्ण तयारी केली होती आणि अखेर माझं स्वप्न साकार झालं, असे प्रदीप गोरड भावनिक शब्दांत सांगतात.
advertisement
त्यांच्या या यशामागे सातत्य, आत्मविश्वास आणि कुटुंबाचा अथक पाठिंबा आहे. प्रदीप सांगतात, अभ्यासासाठी मी कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही. सर्व अभ्यास मी स्वअध्ययनाच्या माध्यमातून केला. वेळोवेळी मित्रमैत्रिणींचा आणि आई-वडिलांचा खूप चांगला पाठिंबा मिळाला. त्यांनी मला कधीही निराश होऊ दिलं नाही.
प्रदीप यांचा अभ्यास पद्धतशीर आणि नियोजनबद्ध होता. त्यांनी सुरुवातीपासूनच महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेच्या सर्व टप्प्यांचा सखोल अभ्यास केला. यशस्वी प्रवासाच्या मागे त्यागही तितकाच महत्त्वाचा होता. प्रदीप गोरड यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला घेतलेला एक निर्णय त्यांच्या ठामतेचं उदाहरण ठरतो. मी डीवायएसपी होईपर्यंत लग्न करणार नाही, असा निर्धार त्यांनी केला होता. माझ्या मनात एकच गोष्ट होती. मला माझ्यावर विश्वास आहे. मी अधिकारी होऊ शकतो आणि आज तेच सत्यात उतरलं आहे, असे ते हसत सांगतात.
राज्यसेवा परीक्षेत 12वी रँक मिळवणे ही छोट्या गावातील तरुणासाठी मोठी कामगिरी आहे. या यशामुळे माळशिरससह संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे. गावकऱ्यांनी आणि मित्रपरिवाराने त्यांचे जोरदार स्वागत केले.
प्रदीप गोरड यांच्या या यशोगाथेने ग्रामीण भागातील अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली आहे. स्वप्न मोठं असलं तरी प्रयत्न प्रामाणिक असतील, आत्मविश्वास अबाधित असेल आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तर काहीही अशक्य नाही, हे त्यांनी दाखवून दिलं आहे.
संघर्षाशिवाय यश मिळत नाही. पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, मेहनत घेतली आणि ध्येय डोळ्यांसमोर ठेवलं, तर कितीही वेळ लागला तरी यश नक्की मिळतं.





