Success Story : सलग सहा वेळा अपयश, लहानपणी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण, दादरच्या प्रगल्भची सैन्यात लेफ्टनंटपदी निवड, Video
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी त्यांची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट म्हणून निवड झाली असून त्यांच्या या यशामुळे दादर परिसरासह संपूर्ण मुंबईत आनंदाचे वातावरण आहे.
मुंबई : अनेक तरुण सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करत असतात. दादरच्या तरुण प्रगल्भ राऊळ यांनी लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न अखेर साकार केलं आहे. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी त्यांची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट म्हणून निवड झाली असून त्यांच्या या यशामुळे दादर परिसरासह संपूर्ण मुंबईत आनंदाचे वातावरण आहे. जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हा प्रवास पूर्ण केला आहे.
प्रगल्भ राऊळ सांगतात की, लहानपणी त्यांच्या परिसरातून आर्मीची परेड निघायची. त्यावेळी त्यांचे आजोबा त्यांना परेड पाहण्यासाठी घेऊन जायचे. सैनिकांना मिळणारा सन्मान आणि आदर पाहून त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. घरी आल्यावर त्यांनी आजोबांना विचारले की या लोकांना इतका मान का दिला जातो. त्यावेळी आजोबांनी सांगितले की हे सैनिक देशाचे रक्षण करतात. त्याच क्षणी प्रगल्भ यांनी ठरवले की भविष्यात आपल्यालाही सैन्यात जाऊन देशसेवा करायची आहे.
advertisement
या ध्येयासाठी त्यांनी लहानपणापासूनच तयारी सुरू केली. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी सी कॅडेट कॉर्प्सच्या ट्रेनिंग शिप जवाहर येथे चार वर्षे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर अकरावी-बारावी पूर्ण झाल्यावर त्यांनी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांनी एनसीसीचे प्रशिक्षणही पूर्ण केले. सैन्यात जाण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी एसएसबी परीक्षा देण्यास सुरुवात केली. मात्र सुरुवातीला त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. सलग सहा वेळा अपयश आले, तरीही त्यांनी हार मानली नाही. सातव्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवत लेफ्टनंट पद मिळवले.
advertisement
या प्रवासात त्यांनी अनेक अडचणींवर मात केली. त्यातील सर्वात मोठा किस्सा म्हणजे त्यांचे वजन. प्रशिक्षणासाठी आवश्यक निकष पूर्ण करण्यासाठी त्यांनी अवघ्या 28 दिवसांत तब्बल 20 किलो वजन कमी केले. त्या काळात त्यांनी दिवसाला फक्त एक सफरचंद आणि लिंबूपाणी घेऊन कठोर मेहनत घेतली.
प्रगल्भ यांच्या शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की ते लहानपणापासूनच स्काउट-गाईड आणि एनसीसीमध्ये सक्रिय होते. त्यांना वाढताना, खेळताना आणि मेहनत करताना आम्ही पाहिले आहे. आज ते लेफ्टनंट झाले याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो.
advertisement
प्रगल्भ यांच्या आई-वडिलांनाही मुलाच्या यशाचा मोठा अभिमान आहे. आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आमचा मुलगा देशसेवेसाठी समर्पित झाला याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले. दादरकरांसाठीही हा अभिमानाचा क्षण असून परिसरातील प्रत्येकजण त्यांच्या यशाचा आनंद साजरा करत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 9:00 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Success Story : सलग सहा वेळा अपयश, लहानपणी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण, दादरच्या प्रगल्भची सैन्यात लेफ्टनंटपदी निवड, Video









