मराठी प्रेक्षकांच्या शिरपेचात मानाचा तुरा! 70 च्या दशकातील सुपरस्टार अमोल पालेकरांचा खास सन्मान
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Amol Palekar: ७० च्या दशकात साध्या मध्यमवर्गीय माणसाच्या सुख-दु:खाला घराघरात पोहोचवलं, तो चेहरा म्हणजेच दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर.
मुंबई : ७० च्या दशकात जिथे बॉलिवूडमध्ये अँग्री यंग मॅनची दहशत होती, तिथेच एक माणूस अत्यंत साध्या वेशात, डोळ्यावर चष्मा लावून आणि चेहऱ्यावर निरागस हसू घेऊन पडद्यावर आला. त्याने साध्या मध्यमवर्गीय माणसाच्या सुख-दुःखाला घराघरात पोहोचवले. तो चेहरा म्हणजेच दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर. भारतीय रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत आता त्यांना प्रतिष्ठित 'मेटा' (META) लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
महिंद्रा एक्सेलन्स इन थिएटर अवॉर्ड्स म्हणजेच 'मेटा'चे हे २१ वे वर्ष आहे. १९ मार्च ते २५ मार्च २०२६ या काळात दिल्लीत हा भव्य थिएटर फेस्टिव्हल रंगणार आहे. आठवडाभर देशभर गाजलेल्या नाटकांचे प्रयोग पार पडल्यानंतर, २५ मार्च रोजी एका दिमाखदार सोहळ्यात अमol पालेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाईल. केवळ सिनेमेच नाही, तर प्रायोगिक रंगभूमीवर अमोलजींनी जे प्रयोग केले, त्याने भारतीय नाट्यसृष्टीला एक नवी दिशा दिली.
advertisement
प्रेक्षकांना आजही भावतो अमोलजींचा साधेपणा
अमोल पालेकर यांची ओळख म्हणजे बॉय नेक्स्ट डोअर. 'छोटी सी बात', 'चितचोर', 'भूमिका', 'बातों बातों में' आणि अजरामर 'गोलमाल' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी साकारलेला सामान्य माणूस आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. त्याकाळी जेव्हा सुपरस्टार्सचा दबदबा होता, तेव्हा अमोलजींनी आपल्या अभिनयाने स्वतःचे एक वेगळे साम्राज्य निर्माण केले होते.
advertisement
दिल्लीत रंगणार 'मेटा'चा भव्यदिव्य सोहळा
यावर्षीचा मेटा फेस्टिव्हल प्रचंड मोठा असणार आहे. यामध्ये २० पेक्षा जास्त राज्यांतून आलेल्या नाटकांमधून निवड केली गेली आहे. तर, १०० हून अधिक शहरांतील थिएटर ग्रुप्सनी यात सहभाग नोंदवला आहे. या सोहळ्यासाठी तब्बल ६० वेगवेगळ्या भाषा आणि बोलीभाषांमधील नाटकांच्या एन्ट्री आल्या होत्या. यातून केवळ १० नाटके शॉर्टलिस्ट करण्यात आली असून, ती १३ वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पुरस्कारांसाठी एकमेकांशी भिडणार आहेत.
advertisement
या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट नाटक, प्रकाश योजना, वेशभूषा, संगीत आणि मुख्य अभिनेता-अभिनेत्री अशा १३ श्रेणींत पुरस्कार दिले जातील. नाट्यसृष्टीतील दिग्गज कलाकारांची ज्युरी या नाटकांचे परीक्षण करणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 10:26 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मराठी प्रेक्षकांच्या शिरपेचात मानाचा तुरा! 70 च्या दशकातील सुपरस्टार अमोल पालेकरांचा खास सन्मान









