नेमकं प्रकरण काय?
अक्षय ठोकळ हा तरुण लाईट फिटिंगचे काम संपवून रात्री घरी परतत होता. अक्षयने लावलेल्या आरोपांनुसार, मुकुंदवाडी भागात दोन पोलिसांनी त्याला अडवले आणि दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. अक्षयने पैसे देण्यास नकार दिल्यावर, पोलिसांनी त्याची गाडी चोरीची असल्याचे म्हणत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण इतकी भीषण होती की पोलिसांच्या हातातील लाठीचे तुकडे झाले.
advertisement
खाकी वर्दीतील गुंडगिरी, नागरिकांमध्ये संतापाची लाट
या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारावर संतापाची लाट उसळली असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही शंका उपस्थित केली जात आहे. पोलिसांनी अक्षयला मारहाण करताना चोरीच्या गाडीचा आरोप केला होता. मात्र, गाडी चोरीची होती तर गुन्हा का नाही? जर पोलिसांना गाडी चोरीची असल्याचा संशय होता, तर रीतसर गुन्हा दाखल का केला नाही? असा सवालही उपस्थित होत आहे. अमानुष मारहाणीचा अधिकार कोणी दिला? कोणत्याही आरोपीला किंवा संशयिताला अशा प्रकारे काठी तुटेपर्यंत मारण्याचा अधिकार कायद्याने पोलिसांना दिलेला नाही.
रुग्णालयाची भूमिका संशयास्पद:
तरुणाच्या मारहाण प्रकरणात रुग्णालयाची भूमिका देखील संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जखमी तरुणाची 'MLC' (मेडिको लीगल केस) घेण्यास रुग्णालय टाळाटाळ का करत आहे? कोणाच्या दबावाखाली ही प्रक्रिया थांबली आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
CCTV मध्ये काय दिसले?
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांची गाडी दिसत आहे, मग अक्षयला पोलीस ठाण्यात का नेले नाही? त्याला आणि त्याची गाडी रस्त्यावरच सोडून पोलीस का निघून गेले? असा सवालही उपस्थित होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
सामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी असलेली पोलीस यंत्रणाच जर अशा प्रकारे भक्षक बनत असेल, तर दाद कोणाकडे मागायची? असा सवाल अक्षयच्या कुटुंबीयांनी विचारला आहे. आता या मारहाण करणाऱ्या दोषी पोलिसांवर पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार? त्यांना निलंबित केले जाणार का? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
