छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला. आता उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.
"मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार ! आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे."
advertisement
वाचा - शिवरायांचा पुतळा 8 महिन्यात कोसळला, मालवणच्या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये नाराजी
तसेच, छत्रपती संभाजीराजे यांनी 12 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले पत्र देखील पोस्ट केले असून छत्रपती संभाजीराजे यांनी तेव्हाच हा पुतळा बदलण्याची मागणी केली असल्याचे उघडकीस आले आहे. तथापि, छत्रपती संभाजीराजे यांच्या या पत्रावर पंतप्रधान कार्यालयाने निराशाजनक भूमिका घेतल्यानेच आजचा दुर्दैवी प्रसंग ओढवल्याचे बोलले जात आहे.