छत्रपती शिवरायांचा 35 फुटी पुतळा 8 महिन्यात कोसळला, मालवणच्या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये नाराजी
- Published by:Shreyas
Last Updated:
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूटी पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे.
मालवण : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूटी पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून हा पुतळा उभारण्यात आला होता. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणात आलेल्या पंतप्रधान मोदींनी या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं. कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळल्यानं शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान सर्व शिवप्रेमींनी शांतता बाळगावी, असं आवाहन ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केलं आहे. तसंच दोषींवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सुप्रिया सुळेंची टीका
दरम्यान पुतळा पडण्याच्या या घटनेवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 'देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे', अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.
advertisement
'विशेष म्हणजे या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री मा. नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्याअर्थी एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते हे उघड आहे. या अर्थाने हि प्रधानमंत्री महोदयांची आणि जनतेची देखील उघड फसवणूक आहे. या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे का झाले यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणे गरजेचे आहे', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Location :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
August 26, 2024 4:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छत्रपती शिवरायांचा 35 फुटी पुतळा 8 महिन्यात कोसळला, मालवणच्या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये नाराजी