एका खड्ड्याने ब्रेनडेड महिलेला केलं जिवंत, अंत्यविधीला जाताना रस्त्यावर चमत्कार, नेमकं काय घडलं?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
रस्त्यावरून प्रवास करताना खड्ड्यामुळे अपघात होऊन जीव गेल्याच्या अनेक बातम्या आपण यापूर्वी वाचल्या असतील. पण आता एक चमत्कारीक घटना समोर आली आहे. रस्त्यावरील एका खड्ड्यामुळे एका महिलेला जीवदान मिळालं आहे.
रस्त्यावरून प्रवास करताना खड्ड्यामुळे अपघात होऊन जीव गेल्याच्या अनेक बातम्या आपण यापूर्वी वाचल्या असतील. पण आता एक चमत्कारीक घटना समोर आली आहे. रस्त्यावरील एका खड्ड्यामुळे एका महिलेला जीवदान मिळालं आहे. डॉक्टरांनी प्रयत्न करूनही त्यांना महिलेला शुद्धीवर आणता आलं नाही. शेवटी डॉक्टरांनीही हात वर केले. त्यांनी महिलेला ब्रेनडेड घोषित केलं. नातेवाईकांनी देखील जड अंत:करणाने वास्तव स्विकारलं. घरी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र अंत्यविधीला जाताना वाटेतच चमत्कार घडला आणि ब्रेनडेड झालेली महिला जिवंत झाली.
ही घटना उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यात घडली आहे. ज्या महिलेला डॉक्टरांनी 'ब्रेन डेड' घोषित केलं होतं आणि ज्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत तयारी सुरू होती. मात्र ती महिला एका चमत्कारिक घटनेनंतर मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप परतली आहे. या अकल्पनीय घटनेमुळे सर्वत्र आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नेमकी काय आहे घटना?
पीलीभीत येथील गोकुलपुरम कॉलनी येथील रहिवासी असेलल्या विनीता शुक्ला या २२ फेब्रुवारी रोजी अचानक घरात बेशुद्ध पडल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बरेली येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं.
advertisement
डॉक्टरांनी सोडली होती आशा
बरेलीतील रुग्णालयात विनीता यांना दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. मात्र, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. डॉक्टरांच्या मते, त्यांच्या शरीराची हालचाल पूर्णपणे थांबली होती, डोळ्यांच्या बाहुल्या विस्तारल्या होत्या आणि त्या 'ब्रेन डेड' स्थितीत पोहोचल्या होत्या. "व्हेंटिलेटर काढताच यांचा मृत्यू होईल," असं डॉक्टरांनी सांगितल्यावर हताश झालेल्या कुटुंबीयांनी त्यांना घरी नेण्याचा निर्णय घेतला.
advertisement
स्मशानात अंत्यसंस्काराची तयारी
२४ फेब्रुवारी रोजी विनीता यांना रुग्णवाहिकेतून घरी आणलं जात होतं. तिकडे घरी नातेवाईक जमले होते, सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं. इतकेच नव्हे तर, अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत सगळी तयारी पूर्ण झाली होती. विनीता यांचा मृतदेह घरी पोहोचेल आणि अंत्ययात्रा निघेल, अशीच सर्वांची भावना होती.
रुग्णवाहिकेचा तो एक झटका आणि...
मात्र नियतीचा खेळ काही वेगळाच होता. रुग्णवाहिका पीलीभीतच्या दिशेने येत असताना वाटेत एका मोठ्या खड्ड्यामुळे गाडीला जोराचा झटका बसला. या धक्क्यामुळे विनीता यांच्या शरीरात एक अचानक हालचाल झाली. ब्रेनडेड घोषित केलेल्या विनीता यांना शुद्ध येत असल्याचे पाहून कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी रुग्णवाहिका थेट रुग्णालयाकडे वळवली.
advertisement
१४ दिवस मृत्यूशी झुंज यशस्वी
विनीता यांच्यावर १४ दिवस अतिदक्षता विभागात उपचार झाले. हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. ज्या महिलेचे अंत्यसंस्कार होणार होते, ती महिला आता पूर्णपणे ठणठणीत होऊन आपल्या घरी परतली आहे.
Location :
Uttar Pradesh
First Published :
Mar 11, 2026 1:53 PM IST
मराठी बातम्या/देश/
एका खड्ड्याने ब्रेनडेड महिलेला केलं जिवंत, अंत्यविधीला जाताना रस्त्यावर चमत्कार, नेमकं काय घडलं?










