आटपाडीची कन्या शाशिकला नांगरे यांचा कोल्हापूर येथील ठेकेदार शिवाजी पवार यांच्याशी 25 वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. आटपाडीतील रवींद्र चव्हाण यांच्या त्या मोठ्या बहीण आहेत. शिवाजी पवार हे शासकीय कामे घेतात. तसेच त्यांचे इतरही उद्योग आणि व्यवसाय आहेत. या व्यवसायासाठी त्यांनी अनेक चार आणि सहा चाकी गाड्या खरेदी केल्या आहेत. मात्र त्यांचे हेलिकॉप्टर खरेदीचे स्वप्न होते.
advertisement
त्यांचे हेच स्वप्न यंदाच्या दसऱ्याला त्यांनी पूर्ण केले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन हेलिकॉप्टर विकत घेतले. पवार जावयांच्या आटपाडीशी चांगला जिव्हाळा असून तेथेही त्यांनी अनेक मित्रमंडळी जोडलेली आहेत.
दसऱ्याच्या मुहूर्तावर हेलिकॉप्टर खरेदी केल्यावर नवीन हेलिकॉप्टर घेऊन थेट सांगलीच्या आटपाडीमध्ये सासरवाडीमध्ये पूजनासाठी आणले. यावेळी हेलिकॉप्टरचे पूजन करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि याच हेलिकॉप्टरमधून कन्या सासरी हेलिकॉप्टरमधून गेली.
शिवाजीराव पवार हे गेल्या २० वर्षांपासून माझे मित्र आहेत. नंतर ते आटपाडीचे जावई झाले. व्यवसायात त्यांनी मोठी आघाडी घेतली, व्यवसाय वाढवत असताना आपल्या वैयक्तिक हौशी आणि महत्त्वकांक्षाही त्यांनी नेहमीच पूर्ण केल्या. हेलिकॉप्टर खरेदीचे त्यांचे स्वप्न होते. आटपाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच जावई सासुरवाडीत आले. याचा वेगळा आनंद आटपाडीकरांना आहे, अशा भावना त्यांचे मित्र तानाजी पाटील यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या.