मिळालेल्या माहितीनुसार, सांगली महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारावर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. मिरजेत पोलिसांनी निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक गुन्हेगारांना हद्दपार करण्याची कारवाई केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रभाग ६ मधील उमेदवार आजम काझी यांच्यासह आठ जणांच्यावर ही हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, उद्या शुक्रवारी मिरजेत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौरा आहे. त्याआधी झालेल्या या कारवाईमुळे मिरजेत एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
अजित पवार गटाचा भाजपवर आरोप
दरम्यान, भाजपाकडून राजकीय सुडबुद्धीतून एक कारवाई करण्यात आल्याचा आरोप आजम काझी यांनी केला आहे. या प्रभागात अजित पवार गटाच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याने भाजपाच्या पायाखालची वाळू घसरली आहे, यातून आपल्यावरील कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप काझींनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराही घेतला होता आक्षेप
काही दिवसांपूर्वी सांगलीतल्या सभेतून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी गृह मंत्रालय आपल्याकडे असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, त्याचा उपयोग माझ्यावर करण्यात आल्याचा आरोप देखील आजम काझींकडून करण्यात आला आहे, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रभागातील उमेदवार म्हणून मैनुदिन बागवान यांच्या अर्जावर देखील भाजपाकडून आक्षेप घेण्यात आला होता, आता आपल्यावरही आज कारवाई केल्याचा आरोप काझी यांनी केला आहे. दरम्यान, आजम काझींवर झालेल्या हद्दपारच्या कारवाईने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
पोलिसांनी का केली कारवाई?
महापालिका निवडणुकीच्या अनुशंगाने मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील शोएब काझी टोळी, एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील सुरज ऊर्फ रमजान शेख टोळी, विटा पोलीस ठाणे हद्दीतील राजाराम बोडरे टोळी तसंच आटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील जितेंद्र ऊर्फ जिच्या काळे टोळी हद्दपार करण्यात आली आहे.
सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार शोएब ऊर्फ मोहमद युसूफ काझी टोळीस, एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार सुरज ऊर्फ रमजान मौला शेख टोळीस सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्हयातून ०१ वर्षे कालावधीकरीता तसंच विटा पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार राजाराम सोपान बोडरे टोळीस सांगली जिल्ह्यातून ०६ महिने, आटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार जितेंद्र ऊर्फ जिच्या दगडु काळे टोळीस सांगली, सोलापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यातून ०२ वर्षे कालावधीकरीता हद्दपार आदेश पारीत केलेले आहेत.
गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समुळ उच्चाटन व्हावं. तसंच चालू सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सुरळीत आणि शांततेत पार पाडणे करीता सदरच्या हद्दपारीच्या कारवाया करण्यात आलेली आहे.
मिरज शहर पोलीस ठाणेच्या हद्दीमधील टोळी
१) शोएब ऊर्फ मोहमद युसूफ साहेबपीर चमनमलीक काझी, वय ३४ वर्षे, रा. टाकळी रोड, मिरज (टोळी प्रमुख) २) मतीन ऊर्फ साहेबपीर चलनमलीक काझी, वय ३२ वर्षे, रा. टाकळी रोड, मिरज ३) अक्रम महंमद काझी, वय ४२ वर्षे, रा. काझीवाडा, मिरज ४) रमेश अशोक कुंजीरे, वय ३९ वर्षे, रा. उदगांव वेस, मिरज ५) अस्लम महंमद काझी, वय ४८ वर्षे, रा. काझीवाडा, मिरज ६) आझम महंमद काझी, वय ३९ वर्षे, रा. गुरुवार पेठ, मिरज ७) अल्ताफ कादर रोहीले, वय ३६ वर्षे, रा. खॉजा बरती, मिरज ८) मोहसिन कुंडीबा गोदड, वय २६ वर्षे, रा. टाकळी रोड, गोदड मळा, मिरज
टोळीवर काय आरोप
या टोळीविरुद्ध सन २००६ ते २०२५ या कालावधीत बेकायदेशीर जमाव जमवून गर्दी, मारामारी, धार्मिक भावना दुखवणे, नुकसान करणे, गंभीर दुखापत करणे, अग्निशस्त्र आणि घातक शस्त्रे जवळ बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, चोरी करणे, खंडणी मागणे, फसवणूक करणे, अनुसूचित जाती जमाती मधील लोकांना जातीवाचक शिवीगाळी करून त्यांना अपमान करुन, स्त्रीचा विनयभंग करण्याचे उद्देशाने त्यांचेवर हमला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, सार्वजनिक उपद्रव करणे, लोकसेवकांनी दिले आदेशाचा भंग करणे, गैर निरोध करणे, गृह अतिक्रमण करणे, दरोडा टाकणे असे शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
नमुद सामनेवाले हे कायद्याला न जुमानणारे असून त्यांचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाया करून देखील त्यांची गुन्हेगारी मालिका सुरू ठेवली आहे. त्यामुळे या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये प्रभारी अधिकारी, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता. चालू सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका व आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या काळात टोळीने गुन्हे करणा-या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाबूत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
