ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेतृत्वाला पत्र लिहिले आहे. या पत्रात राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत सामील करण्याबाबतची आपली भूमिका मांडली आहे. या पत्रातील काही मुद्यांवरून कॉंग्रेसमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून पक्षश्रेष्ठींनी राऊत यांच्यावरील नाराजी स्पष्ट केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राऊत यांनी दिल्लीत काँग्रेसच्या उच्चपदस्थ नेत्यांना पत्र लिहून, मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, या पत्रात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविषयी तक्रारीचे सूर आवळला आहे. थेट प्रदेशाध्यक्षांची तक्रार केल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याआधीच मनसेसोबत कोणतीही आघाडी नको, अशी ठाम भूमिका घेतली. राज ठाकरे यांच्याबाबत चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असेही म्हटले होते. मात्र, राऊत यांनी थेट दिल्लीत पत्र पाठवल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
राज ठाकरे यांच्याबाबत पक्षात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले होते. मात्र, राज ठाकरे यांनासोबत घेतल्यास परप्रांतीय भाषिक मतदार वर्ग दुखावेल अशी भीतीदेखील काँग्रेस नेतृत्वाला असल्याचे म्हटले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा मतभेद उफाळून आले असल्याचे दिसते. मनसेच्या संभाव्य सहभागावर आता सस्पेन्स निर्माण झाला आहे. राऊत यांच्या या पावलाने आघाडीतील राजकीय समीकरणात नवे ताण निर्माण झाले आहेत.