मतदानाला अवघे काही तास उरले असताना लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता भाजप आणि काँग्रेसमधील संघर्ष विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक १४ मधील लक्ष्मी कॉलनी परिसरात भाजप व काँग्रेस समर्थकांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. इथं साडी व पैसे वाटप केल्याच्या आरोपांवरून दोन गटांमध्ये जोरदार वादावाद आणि हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.
advertisement
तसेच वैभव नगर येथील बारा ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात एकलिंगे महाराज हे साड्या वाटप करत असताना पोलिसांना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलिसांनी दोन पोते साड्या ताब्यात घेतल्या. तसेच एकलिंगे महाराजांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित काँग्रेस उमेदवार गणेश देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी भाजप उमेदवार रविशंकर जाधव यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. “निवडणुकीत गैरप्रकारांना थारा दिला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी यावेळी भाजपकडून करण्यात आली.
दुसरीकडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनीही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत या घटनेत आमच्या कार्यकर्त्यांवरही हल्ला झाला आहे. आमची मारहाणीची तक्रार नोंदवून घ्यावी व पोलिसांनी निष्पक्षपणे चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे प्रभाग १४ मधील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस व भाजप यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याचे चित्र आहे.
