फलटणमध्ये डॉक्टर तरुणीने हातावर ‘सुसाइड नोट’ लिहून केलेल्या आत्महत्येचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींमध्ये पोलिसाचाही समावेश असल्याने विरोधकांनी गृहखाते असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले. सातारा पोलिसांनी चौकशी केल्यास त्यांच्यावर दबाव राहण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. या डॉक्टरची आत्महत्या नव्हे, तर हत्या आहे, असा दावाही कुटुंबाने आणि विरोधकांनी केला होता. त्यामुळे पारदर्शक चौकशीसाठी ‘एसआयटी’ नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
कोण कोण असणार या तपास समितीमध्ये?
निष्पक्ष चौकशीसाठी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पोलिस महासंचालकांना दिले. एसआयटीची टीम लवकरच फलटणमध्ये दाखल होणार असून आत्महत्येच्या तपासाला गती मिळणार आहे. या समितीमध्ये अनुभवी पोलिस अधिकारी, गुन्हे अन्वेषण तज्ज्ञ आणि न्यायवैद्यक सल्लागारांचा समावेश आहे. या पथकाला संबंधित कागदपत्रे, पुरावे आणि तपास नोदींचा सखोल अभ्यास करून निष्पक्ष तपास करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
काय आहे प्रकरण?
फलटण इथं २३ ऑक्टोबर २०२५ च्या रात्री उशिरा आढळला होता. फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर महिलेचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत आढळला. मृत्यूपूर्वी डॉक्टर महिलेनं तिच्या हातावर एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये तिने दोन व्यक्तींची नावं नमूद केली होती. पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदणे, याच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप तिने केला होता. तर सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रशांत बनकर याच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला. तिने या दोघांची नावं हातावर लिहिलेली होती. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर बलात्कार आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
