सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. संभाव्य दुर्घटनांचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 20 जूनपासून ते 19 ऑगस्ट 2025 पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून साताऱ्यात विशेषतः पश्चिम भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर दरडी कोसळण्याचा, पाण्याचा प्रवाह वाढण्याचा आणि अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून ही बंदी लागू केली आहे.
advertisement
>> बंद राहणारी पर्यटनस्थळे:
अजिंक्यतारा किल्ला
ठोसेघर, वजराई, लिंगमळा, ओझर्डे, घाटमाथा, केळवली-सांडवली, एकीव, सडा-वाघापूर उलटा असे धबधबे
कास पुष्पपठार व कास तलाव
बामनोली
महाबळेश्वर व पाचगणी
धरण परिसर व इतर घाटमाथ्याची ठिकाणं
या सर्व ठिकाणी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. मात्र, हवामानाचा अंदाज पाहता आणि पूर्वी घडलेल्या दुर्घटनांचा विचार करता, यंदा प्रशासन कोणताही धोका पत्करणार नसल्याचे दिसत आहे. जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. स्थानिक पोलीस आणि वनविभाग यांना देखील या संदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात निसर्गसौंदर्य अनुभवण्याचा मोह होऊ शकतो, मात्र सुरक्षिततेला प्राधान्य देऊन नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.