सातारा : 'साप' असं नुसतं बोलल्यावरच अनेकजणांच्या अंगातून भीतीचा काटा सर्रकन जातो. विषारी असो किंवा बिनविषारी असो, सापाला भलेभले घाबरतात. त्यात अजगर शरिरानं भलामोठा असतोच शिवाय तो डसत नाही, तर दिसेल त्याला डायरेक्ट आवळून गिळून टाकतो. जेव्हा हा आडदांड अजगर सातारकरांच्या गावात शिरला तेव्हा घडला थरार...
मिळालेल्या माहितीनुसार, कारडच्या इंदोली भागात वनपाल संदीप कुंभार यांच्या घराजवळ शनिवारी (19 ऑक्टोबर) संध्याकाळी अतिशय लांबलचक आणि जाड असा अजगर (इंडियन रॉक पायथन) दिसला. या सापाला बघून कुणीही घाबरेल, भीतीपोटी त्याला मारायला धावेल किंवा स्वत:चा जीव गमावून बसेल. पण...
advertisement
भारतीय अजगरांना वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत शेड्युल 1 भाग 1 मध्ये संरक्षित करण्यात आलं आहे. अजगर हा जगात वावरणारा सर्वात मोठा बिनविषारी साप आहे. तो जड आणि सुस्त असला तरी शिकार पकडताना अतिशय वेगवान आणि आक्रमक होतो. शिकार आटोक्यात येताच त्याच्या अंगावर झडप घेऊन त्याच्या शरिराभोवती विळखे घालून त्याला घट्ट आवळतो. केवळ फुप्फुसावर आणि हृदयावर दाब आल्यानंच शिकार गुदमरून मरते. अजगराच्या दोन्ही जबड्यांवर मागे वळलेले अणकुचीदार दात असतात. एकदा जबड्याचा डावा भाग, एकदा उजवा भाग असं आळीपाळीनं पुढे सरकवत अजगर शिकार गिळून टाकतो.
अजगर सुमारे 30 वर्षे जगतो. परंतु अधिवास नष्ट होणं, अपुरं संवर्धन यामुळे भारतीय अजगरांची संख्या सुमारे 30 टक्के कमी झाल्याचं आढळून आलंय. त्यामुळे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेनं सापांची ही प्रजाती धोक्यात येऊ शकते, असं अलिकडेच जाहीर केलं. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, जेव्हा साताऱ्यात संदीप कुंभार यांच्या घराजवळ अजगर दिसला तेव्हा त्यांनी अजिबात आरडाओरडा न करता ही परिस्थिती अत्यंत संयमानं हाताळली. त्यांनी कुणालाही याबाबत सांगितलं नाही, तर सर्वात आधी रेस्क्यू टीमला कळवलं. टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वनपाल संदीप कुंभार यांनी सर्पमित्र अमोल पवार आणि रोहित कुलकर्णी यांच्या साथीनं रात्री अजगराला पकडलं. या अजगराची लांबी तब्बल 7 फुट होती. तर, वजन होतं 10.500 किलोग्रॅम. अजगर दिसेल त्याला सरसकट गिळतो. परंतु या सापाला अतिशय सावधरित्या पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आलं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल संग्राम गोडसे, वनक्षेत्रपाल ललिता पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल सागर कुंभार, वनरक्षक संतोष चाळके, अजय महाडिक, चालक योगेश बडेकर यांनी या अजगराला नैसर्गिक वातावरणात मुक्त केलं.