शिवेंद्रराजेंकडून उदयनराजेंची उमेदवारी फिक्स
भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदार उदयनराजे यांनाच उमेदवारी मिळेल, असं भरसभेत जाहीर करून टाकले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे आणि पुढील 5 वर्षाने होणाऱ्या लोकसभेसाठी देसाई यांनी तयारी करण्याची मागणी शिवेंद्रराजे यांनी या सभेत केली आहे. तर दुसरीकडे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी या मेळाव्यात खासदार उदयनराजे भोसले आणि महायुतीच्या नेत्यांसमोर पुन्हा एकदा आपल्या उमेदवारीची मागणी केली आहे. यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.
advertisement
यावर खासदार उदयनराजे यांनी नरेंद्र पाटील यांच्या भाषणाचा समाचार घेत तुम्ही शिवेंद्रराजे यांना मिसळ खायला घातली होती. पण मी या स्टेजवर बसलेल्या सगळ्यांना मिसळ खायला घालणार असल्याची मिश्किल टिप्पणी राजे यांनी केली आहे.
वाचा - राज ठाकरेंचं इंजिन महायुतीच्या यार्डात येणार? मोदींच्या सभेआधी फडणवीसांनी क्लिअर केलं
अजितदादांच्या आमदार गैरहजर
साताऱ्यातील वाई येथील महायुतीच्या मेळाव्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील आणि त्याचे बंधू नितीन पाटील हे या मेळाव्याला उपस्थित राहिले नाहीत. आज कराड, वाई आणि सातारा तालुक्यात महायुतीच्या वतीने मेळावे होत असताना या मेळाव्याकडे अजित पवार गटानं पुर्ण पाठ फिरवल्याचं पहायला मिळाले. महायुतीकडून अद्याप कोणाचीही उमेदवारी जाहीर झाली नसली तरी भाजप कडून खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे सातारा अजित पवार गटाचे जिल्ह्यातील नेते नाराज असल्याचे या वरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे भाजप आणि खासदार उदयनराजे ही नाराजी कशी दूर करणार हे पहावे लागणार आहे.
