सातारा : अलीकडच्या काळात अनेक तरुण-तरुणी सरकारी नोकरीसाठी धापडत असतात, हे तुम्ही पाहिले असेल. मात्र, एक व्यक्ती असा आहे, ज्याने आपल्या स्वप्नांसाठी, ध्येयासाठी भारतीय सैन्य दलातील नोकरी सोडली आहे. आर्चरीमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याचे त्याचे स्वप्न आहे. यासाठी त्याने भारतीय सैन्यदलातील नोकरी सोडली.
कोण आहे आदर्श दुधे -
advertisement
आदर्श दुधे असे या व्यक्तीचे नाव आहे. ते सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कडेगाव येथील रहिवासी आहेत. आदर्श हा 2007 पासून तिरंदाजी खेळाडू आहे. त्याने नॅशनल स्पर्धेत 1 सुवर्ण, 3 रौप्य, 5 कांस्यपदकासह एकूण 9 पदके जिंकले आहेत. त्याचबरोबर राजस्तरीय स्पर्धेत 8 सुवर्ण, 3 रौप्य, 1 कांस्यपदकासह 12 पदकांवर त्याने मोहर उमटवली.
2010 मध्ये 14 वर्षाखालील आर्मी बॉईजमधून निवड झालेल्या आदर्शने 3 वर्ष पूर्ण कष्टाने, प्रामाणिकपणे आणि जिद्दीने आर्चरी खेळामध्ये मन लावून प्रयत्न केले. मात्र, सैन्यदलाची शिस्त, वेळेवरची ड्युटी आणि खेळण्यासाठीचा वेळ यातून तीन वर्षात आर्चरीमध्ये तो फक्त एक कांस्यपदक जिंकू शकला. याची खंत त्याच्या मनात होती.
ऑलम्पिकमध्ये आर्चरी खेळात भारताला सुवर्णपदक जिंकण्याचे लहानपणीच पाहिलेले स्वप्न हे आदर्श साठी कायमच सर्वात श्रेष्ठ आणि आदर्श राहिले आहे. त्यामुळे त्याने पाहिलेले स्वप्न त्याला झोपू देत नव्हते. मनात चालू असलेली आर्चरी खेळाबद्दलची तळमळ, 3 वर्षात 1 पदक जिंकू शकलेल्याची खंत, खेळात न होणारी प्रोग्रेस आणि प्रॅक्टिससाठी न मिळणारा वेळ यावर कशाप्रकारे मात करायची, पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचे की सैन्य दलातील नोकरी करायची, याबाबत तो संभ्रमात होता. त्यामुळे नेहमी त्याच्या मनाची घालमेल होत होती. अखेर आपल्या स्वप्नांसाठी 2017 मध्ये सैन्यदलातील नोकरी सोडण्याचे धाडस करून तो घरी आला.
मुलाने सैन्यदलातील केंद्र सरकारची नोकरी सोडल्याने घरातील सदस्यांनी विरोधही केला. मात्र, त्याने आपल्या स्वप्नांसाठी आदर्शने नोकरी सोडल्याचे सांगितले. याचा कुटुंबाला मोठा धक्काही बसला होता. दरम्यान, काही दिवसानंतर अचानक त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. यातून आदर्श सावरतोय तोच वडिलांचा पुन्हा अपघात झाला. यामुळे आदर्शची आर्थिक परिस्थिती कोलमडून मोडकळीस आली होती.
MNC मधील नोकरी गमावली, नंतर कधीच नोकरी न करण्याचा निर्णय घेतला, आता महिन्याला लाखोंची कमाई
या अचानक आलेल्या संकटांना आदर्शने खंबीरपणे तोंड दिले. त्यावर मातही केली. मात्र, आपण सैन्यदलातील नोकरी सोडून कशासाठी आलो होतो, याची खंतही मनात तशीच राहिली. त्यामुळे जिद्दीने पेटून उठत पुन्हा तिरंदाजीचा सराव सुरू केला. मात्र, यासाठी लागणारे साहित्य मोडकळीस आले होते. कोरोनाकाळातील लॉकडाऊन, नोकरी सोडण्याचा तणाव, वडिलांवर आलेले अचानक संकट आणि लॉकडाऊनमुळे प्रॅक्टिस करणे अशक्य होत होते.
यावेळी डीपी भोसले कॉलेज कोरेगाव येथे त्याने प्रवेश घेतला आणि तिथे त्याला बाळकृष्ण भोसले सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर दोन-तीन वर्ष सराव सुरू ठेवला. वडिलांचे पंधरा गुंठेचे शेती क्षेत्रात त्याने तीन गुंठ्यामध्ये आपली प्रॅक्टिस चालू केली. सराव करत असताना शालेय मुलांनाही प्रशिक्षण दिले. मात्र, साधने म्हणजे धनुष्य नसल्याने प्रॅक्टिस करणे अवघड झाले आहे. त्यामुळे आदर्श दूधे याने सरकार प्रशासन आणि दानशूर व्यक्तींना मदतीची मागणी देखील केली आहे.