36 तास प्रशांत बनकर कुठं गायब होता?
साताऱ्यातील महिला डॉक्टर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याला साताऱ्यातून नाही तर पोलिसांनी पुण्यातून अटक केलेली आहे. पोलिसांनी तांत्रिक गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर प्रशांत बनकरचा माग काढला. त्यानंतर पुण्यातील पहाटेच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे. पण 36 तास प्रशांत बनकर कुठं गायब होता? असा सवाल विचारला जात आहे. प्रशांत बनकर याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप महिला डॉक्टरने केला होता. त्यानंतर आता पोलीस या प्रकरणात कसून चौकशी करतील.
advertisement
मित्राच्या फार्महाऊसवर लपून बसला
महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यापासून प्रशांत बनकर फरार झाला होता. आपण पकडलं जाणार, याची प्रशांत बनकरला भीती होती. त्यामुळेच त्याने फलटणमधून पळ काढला. प्रशांत बनकर याने थेट पुणे गाठलं. इथं तो एका मित्राच्या फार्महाऊसवर लपून बसला होता. मागील काही तासांपासून तो इथंच मुक्कामी होता. पोलिसांना याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पहाटे चार पाचच्या आसपास ग्रामीण पोलिसांनी तातडीने छापा टाकला अन् प्रशांत बनकरला अटक केली.
गोपाल बदने याला अटक कधी होणार?
दरम्यान, प्रशांत बनकर सापडला असला तरी मुख्य आरोपी गोपाल बदने हा अजूनही फरार असल्याचं पाहायला मिळतंय. गोपाल बदने याला पकडण्यासाठी पोलिसांची पाच पथक रवाना करण्यात आलेले आहेत. पीएसआय असल्याने गोपाल बदने याला तपासातील धागेदोरे माहिती आहेत. त्यामुळे गोपाल बदनेला शोधणं पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे. गोपाल बदने याला अटक कधी होणार? असा सवाल महिला डॉक्टरचे नातेवाईक विचारत आहेत.
