मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड नागपूर महामार्गावर शनिवारी संध्याकाळी ५ वाजून ३३ मिनिटांनी हा अपघात झाला. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव पाटीजवळ हा अपघात घडला. या अपघातात सय्यद हुजैफ ( वय 32) आणि शेख सलाम (वय ३० ) यांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही स्कॉर्पिओ गाडीने अर्धापुरहून नांदेडकडे येते होते. पण अचानक गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि भरधाव स्कॉर्पिओ गाडीने पादचाऱ्याला उडवलं. त्यानंतर अनियंत्रित झालेली ही भरधाव गाडी दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटली. गाडी उलटल्यानंतर काही अंतर फरफटत गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या भयानक अपघातात स्कॉर्पिओचा चक्काचूर झाला.
advertisement
या अपघातात स्कॉर्पिओमध्ये सहा तरुणांसह अन्य एक अस सात जण जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने तातडीने जखमींना नांदेडच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान, संध्याकाळी सय्यद हुजैफ आणि शेख सलाम यांचा मृत्यू झाला.
रमझानचा उपवास सोडण्यासाठी चालले होते घरी
शहरातील पाकिजानगर येथील आठ तरुण अर्धापूर इथं बांधकाम कामगार म्हणून कामावर होते. आज काम संपवून हे सर्व आठ तरुण स्कॉर्पिओ गाडीतून अर्धापूरहून नांदेडकडे येत होते. रमझानचा महिना असल्याने उपवास सोडण्यासाठी ते परत येत होते. त्यांच्या भरधाव गाडी पिंपळगाव पाटीजवळ आली. याठिकाणी एक व्यक्ती रस्ता ओलांडत होता.
अचानक तो गाडीसमोर आल्याने चालकाचा ताबा सुटला. त्या पादचाऱ्याला उडवून गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकली गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी दुभाजक ओलांडून घसरत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकवर ही गाडी आदळली. यात सर्व ८ तरुण आणि पादचारी जखमी झाला. उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संतापजनक बाब म्हणजे, अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या सोबतच काहींनी वाद घातल्याने बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.