भडगावमध्ये चिमुकलीवर अत्याचार
जळगावच्या भडगाव तालुक्यातील गोंडगावमध्ये 7 वर्षीय चिमुकलीला आमिष देऊन गुरांच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर नराधमाने अत्याचार केला. अत्याचार केल्याची बाब इतरांच्या लक्षात येऊ नये म्हणून नराधमाने मुलीला ठार केलं. यानंतर बैलांना खाऊ घालण्याच्या कुट्टीच्या खाली मुलीचं प्रेत ठेवलं. तीन दिवसांनंतर नागरिकांना या गोठ्यातून उग्र वास यायला लागला तेव्हाच ही घटना उघडकीस आली.
advertisement
आरोपी विनोद पाटीलला अटक केल्यानंतर त्याला आमच्या ताब्यात द्या या मागणीसाठी गावकऱ्यांनी आंदोलन केलं, तसंच दगडफेकही करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील तरुणींसह महिला रस्त्यावर उतरून मोर्चा काढला. यावेळी पीडित मुलीच्या आई-वडिलांसोबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन द्वारे संवाद साधला. या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होईल या संदर्भात माझे पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे, अशी ग्वाही देत मुख्यमंत्र्यांनी पीडित मुलींच्या कुटुंबियांना धीर दिला.
पारोळ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
नैसर्गिक विधीसाठी नदीकाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती अत्याचार करून दगडाने डोक्यावर वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पारोळा तालुक्यात धुळपिंप्री गावात घडली आहे. पीडित मुलीला शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित तरुण बारक्या उर्फ अशोक मंगा भिल याच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तात्काळ अटक करून फाशी द्यावी या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी पारोळा पोलीस स्टेशन गाठून ठिय्या आंदोलन केलं.
वस्तीगृहात अल्पवयीन मुलींचं शोषण
एरंडोल तालुक्यातील एका गावात मुलींच्या वस्तीगृहात अल्पवयीन मुलींचं शोषण करण्यात आलं आहे. वस्तीगृहातील काळजीवाहकानेच मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत सरकार पक्षातर्फे स्वतः पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून त्या फिर्यादीवरून काळजीवाहक, काळजीवाहकाला साथ देणारी त्याची पत्नी, वस्तीगृहाच्या अधीक्षका, सचिव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, तसंच संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर पीडित मुलींना बालसुधार गृहात दाखल करण्यात आले आहे. गणेश शिवाजी पंडित असं, या मुलींवर अत्याचार करणाऱ्या काळजी वाहकाचे नाव आहे.
Wardha : वर्ध्यात चाललंय काय? एका आठवड्यात तीन खून, दोन लाचखोरीच्या घटना
मित्राचं मित्रावर फायरिंग
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. जुन्या वादातून एका तरुणाने आपल्या मित्रावरच फायरिंग केली. आकाश तंवर नामक तरुणावर गोळीबार झाला असून हा गोळीबार त्याचाच मित्र सोपान राजपूत याने केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतला असून त्याच्याकडून पिस्तूल जप्त केलं आहे.
आठ-दहा दुध डेअरीवर रेड
चाळीसगाव शहरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत आठ ते दहा दूध डेरींवर प्रशासनाने धाड टाकत दुधात भेसळ आढळून आल्याने चाळीसगाव सह परिसरात दूध डेरी चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर आतापर्यंत दूध भेसळ समितीने जवळपास चार हजार लिटर दूध नष्ट केले असून दुधाचे माहेरघर असलेल्या चाळीसगावात भेसळयुक्त दूध आढळल्याने दूध डेअरींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये एकच संतापाची लाट पाहायला मिळत आहे.