केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते. केंद्र शासनाच्या या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे प्रति वर्षी आणखी सहा हजार अनुदान देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविली जाते. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्षी बारा हजार अनुदान मिळत असते. राज्याच्या नमो शेतकरी महासन्मना योजनेंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण सहा हप्ते देण्यात आले आहेत.
advertisement
शासन निर्णयानुसार सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या महिन्यांचे अनुदान लाभार्थ्यांना भेटणार आहे. ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश आहे. त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यातील सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना समोर ठेऊन दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार काम करीत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी कृषी विभाग सातत्याने काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविली जाते. या योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार असून अतिवृष्टीमुळे अडचणीत असणाऱ्या शेतकरी बांधवांना या योजनेचा फायदा होणार आहे. तसेच अतिवृष्टीमध्ये बाधित शेती पिकाचे पंचनामे अंतिम टप्यात असून इतर कार्यवाही पूर्ण झाल्यावर बाधित शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.