मुंबई: बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची लेक आता कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. एका जमीन खरेदी व्यवहारामुळे सुहाना खान अडचणीत आली आहे. अलिबागजवळील थळ येथे सुहाना खानने जमीन खरेदी केली होती. आता याच व्यवहारावरुन सुहाना खानच्या अडचणी वाढल्या आहेत. सुहाना खानने ही जमीन जवळपास 13 कोटींना खरेदी केली होती. संबंधित जमिनीच्या मालकी आणि वापराबाबत गंभीर तक्रारी पुढे आल्या असून तहसील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ही जमीन 1968 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नारायण विश्वनाथ खोटे यांना झाडे लागवडीसाठी भाडेपट्ट्याने दिली होती. या जमिनीवर कोणतेही बांधकाम करण्यास मनाई होती. नारायण खोटे यांच्या निधनानंतर जमीन त्यांच्या वारसदारांकडे गेली. त्यांच्याकडून सुहाना खानने विक्रीसाठी करार नोंदवला.
प्रकरण काय?
जमिनीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असल्याने खोटे कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला. या अर्जावर तपासणी करताना तहसील कार्यालयाने महसूल मंडळ निरीक्षकाचा अहवाल घेतला. त्यामध्ये जमिनीवर बांधकाम नसल्याचे नमूद करण्यात आले. यावर आधारित सकारात्मक शिफारसही करण्यात आली. परंतु, साठेकरार नोंदणी करताना या जमिनीवर प्रत्यक्षात तीन बांधकामे अस्तित्वात असल्याचे कागदपत्र जोडले गेले. ग्रामपंचायतीकडून या बांधकामांना घर क्रमांकही देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तहसील कार्यालयाने दिलेला अहवाल दिशाभूल करणारा असल्याचे आरोप करण्यात येत आहे.
याशिवाय, संबंधित जमीन सीआरझेड क्षेत्रात येत असूनही येथे बांधकामे झाली आहेत. प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे अॅड. विवेकानंद ठाकूर यांनी केली आहे. शर्तभंग झाल्याने सदर जमीन शासनजमा करावी अशी मागणी अॅड. ठाकूर यांनी कोकण आयुक्तांकडे केली आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालय आणि अलिबाग तहसील प्रशासनाचा कारभार संशयास्पद असल्याच्या आरोपांनी हा व्यवहार आणखी गडद वादात सापडला आहे.