शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला किंवा त्यांना कमी लेखले गेले, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. साताऱ्यातील मेढा येथील शिवसेना मेळाव्यात आणि जावळीचे सुपुत्र तसेच नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात त्यांनी हे महत्त्वाचे वक्तव्य केले.
महायुतीतील घटक पक्षांतील काही नेत्यांकडून शिवसेना कार्यकर्त्यांना अडचणीत आणले जात असल्याचे आणि त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचे आरोप यावेळी शिवसैनिकांनी मांडले. शंभूराज देसाई यांनी या आरोपांची दखल घेतली. शिवसैनिकांचा मानसन्मान राखणार असल्याचे त्यांनी म्हटले. "जर महायुतीमधूनच आपल्याला कमी लेखलं जात असेल, तर आपली ताकद आपण स्वबळावर दाखवून देऊ," असा स्पष्ट वक्तव्यच त्यांनी केले.
advertisement
शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे हे वक्तव्य महायुतीतील घटक पक्षांसाठी इशारा असल्याचे म्हटले जाते. त्यांचा प्रामुख्याने रोख हा शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर असल्याची चर्चा रंगली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसैनिकांना सजग राहण्याचे आवाहन केले. "तुमच्या केसाला धक्का लागला, तर मी तुमच्या पाठीशी आहे," असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, यावेळी शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये अनेकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
