राष्ट्रवादी शरद पवार गटात मागील काही दिवसांपासून अंतर्गत घडामोडी वाढल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत पक्षातील मतभेद समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरुनही वाद सुरू झाले आहेत. जयंत पाटील यांना हटवून नवीन प्रदेशाध्यक्ष निवडण्याची मागणी करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे जयंत पाटील यांनी प्रतिआव्हान देत सगळ्यांनी आपल्या मतदारसंघात किती मते मिळाली, हे सांगण्याचे आव्हान दिले. तर, दुसरीकडे काही जणांचा अजित पवारांकडे जाण्याचा कल आहे. तर काहीजण त्याला विरोध करत आहेत. तर, अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्याकडून शरद पवार गटातील खासदार फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
भाजपचा निशाणा...
राज्याचे सांस्कृतिक मंत्री आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीतील वादावर भाष्य केले. शेलार यांनी म्हटले की, विधानसभा निवडणुकीपूर्वीच मी महाविकास आघाडी निवडणुकीनंतर फुटणार असल्याचे सांगितले होते. ही आघाडी केवळ निवडणुकीसाठी एकत्र आलेली होती. निकाल लागल्यानंतर ती फुटणार हे नक्की होते. यानुसारच ‘मविआ’ नावाची गोष्ट आता अस्तित्वात नाही. त्यांची ‘एक्सपायरी डेट’ झाली असल्याची टीका शेलार यांनी केली.
पवारांच्या राजकीय ऱ्हास सुरू...
सत्तेसाठी एकत्र आलेले आता निवडणुका होताच एकमेकांच्या विरोधात दिसत आहेत. राज्याच्या विकासाचा व मविआचा संबंध नव्हताच, असेही त्यांनी म्हटले. शरद पवार यांच्या गटात अंतर्गत कलहाचे प्रकार घडत आहेत हे नैसर्गिक आहे. या गटाच्या आणि पवारांच्या राजकीय ऱ्हासाला आता सुरुवात झाली असल्याची टीकाही शेलार यांनी केली.