शिर्डी संस्थानच्यावतीने साईबाबांचा प्रसाद म्हणून लाडू विक्री केली जाते. यापूर्वी 25 रुपयांत 3 लाडू मिळत होते. मात्र आता केवळ दोन लाडूंसाठी 30 रुपये मोजावे लागणार आहेत. संस्थानच्या या निर्णयामुळे भाविकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. “भाविकांच्या देणग्यांवर चालणाऱ्या विश्वस्त संस्थेने असा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
advertisement
संस्थानकडून मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनानंतर मोफत वाटल्या जाणाऱ्या बुंदी प्रसादामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. मात्र हा तोटा भाविकांकडूनच वसूल करणे योग्य आहे का, यावर चर्चा रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे संस्थानने गोरगरिबांना परवडणारे 10 रुपयांचे एक लाडूचे पाकीट आणि मध्यमवर्गीयांना सोयीचे 25 रुपयांचे 3 लाडूचे पाकीट बंद केले आहे. आता केवळ ३० रुपयांचे दोन लाडू असलेले एकच “प्रीमियम” पाकीट उपलब्ध असेल. यामुळे परवडणारे पर्याय संपुष्टात आले आहेत. एका बाजूला मोफत भोजनालय, तसेच माफक दरातील चहा, कॉफी, दूध व नाश्त्याची योजना कौतुकास्पद ठरत असतानाच, प्रसादातून हिशेब जुळविण्याची कसरत भक्तांना पटत नाही.
साई समाधीचे दर्शन घेऊन परतताना भाविक लाडू प्रसाद मोठ्या श्रद्धेने घरी घेऊन जातात. मात्र आता या प्रसादाची गोडी त्यांच्या खिशाला परवडणार की नाही, हाच खरा प्रश्न बनला आहे.