पुणे जिल्ह्याच्या शिरुर शहरात काही शाळकरी मुलांमध्ये हा तुफान राडा झाला. शाळकरी मुलांचे दोन गट आपसात वाद घालताना आणि एकमेकांना मारताना दिसत आहे. या घटनेचा १५ सेकंदाचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाळकरी विद्यार्थी एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. ही घटना शिरूर शहरातील BJ कॉर्नर चौक परिसरात घडली.
advertisement
शिरुर शहरातील गजबजलेल्या BJ कॉर्नर चौकात शाळकरी मुलांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भर रस्त्यात, नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या प्रकारामुळे शहरातील कायदा–सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये शाळेचे गणवेश घातलेले काही विद्यार्थी एकमेकांना मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहेत. काहीजण लाथा बुक्क्यांचा मारा करत असल्याचं देखील दिसत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची दखल शिरुर पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केलाय. मात्र पोलिसांकडून संबंधित शाळांवर आणि विद्यार्थ्यांवर कोणती कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. यापूर्वीच शिरूरपासून काही अंतरावर असलेल्या राजगुरूनगरमध्ये अशाच किरकोळ वादातून विद्यार्थ्याची हत्या झाली होती. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन काय पावलं उचलणार? हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
