भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कोकणात सिंधुदुर्गातल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीनंतर सर्व काही विसरलं पाहिजे असे वक्तव्य केले आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपात झालेल्या वादाला त्यांच्या या वक्तव्याला किनार आहे. सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये तर शिवसेना आणि भाजपात वाद विकोपाला गेला होता.कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपात परस्परांच्या नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळं वातावरण आणखीनच बिघडलं होतं. यावरून दोन्ही बाजूंनी एकमेकांना आरोप प्रत्यारोप आणि आव्हान आणि प्रतिआव्हान दिलं गेलं होतं.
advertisement
निलेश राणेंची प्रतिक्रिया
आता नगरपालिका आणि नगरपंचायतीचं मतदान पार पडल्यानंतर महायुतीतल्या या दोन महत्त्वाच्या पक्षांमधील नेत्यांमधला हा वाद मिटवण्यासाठी चर्चा झाली. यातून या संघर्षावर तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एकीकडे रवींद्र चव्हाणांनी आपली भूमिका मांडल्यानंतर कोकणात आक्रमक भूमिका घेतलेल्या शिवसेना आमदार निलेश राणेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. एकत्रितपणे निवडणूक लढवली पाहिजे .रवींद्र चव्हाणांना भेटणार असल्याचंही निलेश राणेंनी म्हटलंय. आपली भूमिका निवडणुकीत कायम ठेवल्याचं निलेश राणेंनी अधोरेखित केलंय, आपल्या प्रश्नांची उत्तर चव्हाणांनी द्यावीत असंही त्यांनी म्हटलंय.
विरोधकांनी महायुतीवर निशाणा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत महायुतीतच मुख्य लढत झाल्याचं चित्र दिसून आलं. या निवडणुकीचा फोकस हा प्रमुख शिवसेना आणि भाजपासह महायुतीवरच होता.विरोधकांची जागा सत्ताधाऱ्यांनी व्यापली होती. सत्ताधाऱ्यांधील या नुरा कुस्तीनं विरोधकांचं आस्तित्व हिरावून घेतलं होतं. आता महायुतीत सलोख्याची भाषा सुरू झाल्याबद्दल विरोधकांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.
महायुतीकडून पावलं उचलली जाणार
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक ही शिवसेना आणि भाजपात कुरघोडीच्या राजकारणानं गाजली.
यापुढील काळात जिल्हापरिषद आणि महापालिकांच्या निवडणुका होणार आहे.या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात वाद कायम राहिल्यास महायुतीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपातील कुरबुरींवर तोडगा काढण्यासाठी महायुतीकडून पावलं उचलली जाणार आहेत.
