भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये शिंदे गटाने ठाकरे गटाला खिंडार पाडले असल्याचे चित्र आहे. ठाकरेंच्या महत्त्वाच्या शिलेदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पुण्यातील हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानला जात आहे. तर, ठाकरे गटाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे देखील नाराज असल्याचं दिसून आले आहे. मुंबईतील ठाकरे गटाच्या दिग्गज महिला नेत्या राजूल पटेल यांनी देखील ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला आहे.
advertisement
अजूनही वेळ गेली नाही...
एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केले आहे. संजय शिरसाट यांनी म्हटले की, आता जोडण्याची वेळ आली असून अद्याप दोघांमधलं अंतर वाढलं नाही. त्यामुळे दोन्ही शिवसेना जोडता येतील. दोन शिवसेना झाल्या याचं फार दुःख होत असून संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही शिरसाट यांनी म्हटले. दोन्ही शिवसेना एकत्र करण्यासाठी दोघांचे तार जोडले पाहिजेत. मात्र, प्रयत्न एका बाजूने करून चालणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
