शिवेंद्रराजे यांच्या साताऱ्यातील सत्काराला मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता. सत्कारानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यानंतर मराठा समाजाने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना खांद्यावर घेऊन जल्लोष देखील केला. सातारा गॅझेट लागू करण्यासाठी आरक्षण उपसमितीची बैठक येत्या मंगळवारी आहे. त्यानंतर गॅझेटसंबंधी कायदेशीर प्रक्रिया सुरू करू, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
महिन्याचा आत सातारा गॅझेट लागू करू
महिन्याचा आत सातारा गॅझेट लागू करू, असा शब्द आम्ही मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. सातारा गॅझेटमध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे कायदेशीर बाबी पूर्ण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे सगळे घेऊन जाऊ, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले आहे.
सातारा गॅझेटप्रकरणात शिवेंद्रराजे यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार
जरांगे पाटील यांच्या उपोषणावेळी त्यांच्या बोलण्यात सातारा गॅझेटचा उल्लेख अनेक वेळा आला. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे मिळवायची असतील, तर सातारा गॅझेटमधील नोंदी या अतिशय महत्त्वपूर्ण असतील. त्यामुळे गॅझेटचा अभ्यास करून त्यातील कायदेशीर त्रुटी दूर करून आश्वासन दिल्याप्रमाणे पुढील महिन्याभरात अंमलबजावणी झाल्यास समाजाला त्याचा मोठा फायदा होणार आहे. अर्थात ही सगळी जबाबदारी शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. विखे पाटील यांच्या बरोबरीने जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यात शिवेंद्रराजे यांचाही महत्त्वाचा सहभाग होता. सातारा गॅझेटचे मी पाहतो, असे म्हणून सातारा समाज बांधवांचे लक्ष त्यांनी आपल्याकडे वेधून घेतले. राजघराण्यातील असले तरी एरवी केवळ साताऱ्यापुरती त्यांची चर्चा असते, मात्र जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील यशस्वी शिष्टाईनंतर राज्यभरात त्यांचीही चर्चा होत आहे.