बदलापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १९ अ मधून शीतल राऊत यांच्याविरोधात चार जणांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीवेळी भाजपच्या कांचन मांडवगडे व महाविकास आघाडीच्या वर्षा चव्हाण यांचे अर्ज बाद झाले. त्यानंतर भाजपच्या प्रज्ञा सूर्यवंशी, महाविकास आघाडीच्या उमेदवार मानसी येलवे यांचे अर्ज दाखल होते. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार, असं बोललं जात होतं. मात्र शेवटच्या क्षणी भाजपच्या प्रज्ञा सूर्यवंशी आणि मविआच्या मानसी येलवे यांनी शॉकिंग निर्णय घेतला. दोघांनी माघार घेतल्याने राऊत बिनविरोध निवडून आल्या. राऊत यांच्या विजयानंतर पक्ष कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत मोठा जल्लोष केला.
advertisement
हा विजय म्हणजे बदलापूर शहरात शिवसेनेची सत्ता येणार, याचे भाकीत आहे. विरोधकांनी अर्ज मागे घेतला, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. त्यांना लढण्याची ताकद नसल्यामुळे किंवा मैत्रीपूर्ण लढत असेल, असे म्हणून अर्ज मागे घेतले असावेत. मला कोणावरही टीका करायची नाही. मी नगरसेविका म्हणून निवडून आले तरी पक्षातील इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी मी मैदानात उतरणार आहे, असे शीतल राऊत यांनी सांगितले.
विशेष म्हणजे २०१५ च्या निवडणुकीत बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत एकूण पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यात भाजपच्या तीन आणि शिवसेनेच्या दोन उमेदवारांचा समावेश होता. या पाच उमेदवारांमध्ये शीतल राऊत देखील होत्या. यंदा बदलापूरमध्ये केवळ एकच उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. शीतल राऊत यांनी दहा वर्षात पुन्हा चमत्कार घडवल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
माघारीने वरिष्ठही बुचकळ्यात
शिंदेच्या शिवसेनेची एक जागा बिनविरोध निवडून आल्यानंतर भाजपच्या अनेक वरिष्ठांनी यावर बोलणे टाळले. भाजप उमेदवाराने स्वत: हून उमेदवारी अर्ज मागे घेतला की भाजपच्या वरिष्ठांच्या सूचनांनुसार हा निर्णय घेतला याबाबत अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
