शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. 'सबका मालिक एक है' असं सांगणाऱ्या साईबाबांच्या भक्तांमध्ये श्रीमंतापासून गोरगरीब भक्तांचा समावेश होतो. काही वेळेस साईबाबाच्या दर्शनाला येताना अप्रिय घटना घडते. घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन करेपर्यंत काही अप्रिय घटना घडली तर पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण संबंधिताला किंवा त्याच्या कुटुंबियांना मिळणार आहे.
advertisement
विम्याचे संरक्षण मिळवण्यासाठी काय करावं?
शिर्डी साईबाबा संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. साईभक्तांनी दर्शनाला येण्याआगोदर साई संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर आपली नोंदणी करणं बंधनकारक आहे. घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन करेपर्यंत काही अप्रिय घटना घडली तर पाच लाखांपर्यंतचं विमा कवच संबंधितांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना मिळणार आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी माहिती दिली.
भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येईल, त्यांनी दर्शनाला निघण्यापूर्वी साईबाबा संस्थानची ऑनलाईन वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे भक्त साईबाबांच्या दर्शनासाठीच येत आहे, याची ओळख पटण्यास मदत होईल, असे गाडीलकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे साई भक्तांनी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला येण्याआधी साईबाबा संस्थानच्या वेबसाईटवर ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले.
शिर्डीत गुढी पाडव्याचा उत्साह...
साईंच्या शिर्डीत मराठी नवीन वर्ष आणि गुढी पाडव्याचा उत्साह दिसून आला. साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर पारंपारिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रूपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठीची माळ परिधान करण्यात आली आहे. मराठी नवीन वर्ष आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिर्डीत साईभक्तांची गर्दी उसळली आहे.